मारहाणीत आठ पोलीस जखमी, वाहनांची तोडफोड; वाहतुकीला फटका
मुंबई : बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने आत्महत्या करणाऱ्या पित्याच्या अंत्ययात्रेत जमावाने कुर्ला परिसरात दगडफेक करत बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली. या घटनेत आठ पोलीस जखमी झाले. दगडफेकीत पोलिसांच्या तीन वाहनांसह एसटी महामंडळाची बस आणि अन्य खासगी वाहने जमावाने फोडली. जमवाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जमावातील शंभर ते दीडशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मार्च महिन्यात कुर्ला परिसरात राहणारी तरुणी बेपत्ता झाली. कुटुंबाने नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार देताना ठक्कर बाप्पा वसाहतीतील पादत्राणांच्या बाजारपेठेत मजुरी करणाऱ्या भागचंद फुलवारिया नावाच्या तरुणावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी राजस्थानवरून या तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली. मात्र चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी भागचंदला सोडले. २५ एप्रिलला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने तिच्या पित्याने १३ ऑक्टोबरला लोकलखाली आत्महत्या केली. पित्याने मृत्यूपुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्या चिठ्ठीवरून मूळ गुन्ह्य़ात ३६८ कलम (अपहृत व्यक्तीला दडवून ठेवणे) जोडण्यात आले आणि भागचंदसह अन्य चार व्यक्तींना अटक करण्यात आली.
मुलीचा शोध लावा तरच पित्याचा मृतदेह ताब्यात घेऊ, अशी मागणी कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी लावून धरली. अखेर कुटुंबाने पित्याचा मृतदेह मंगळवारी ताब्यात घेतला. या अंत्ययात्रेत पाच ते सहा हजारांचा जमाव सहभागी झाला. या जमावाने व्ही. एन. पुरव मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग आणि शीव-पनवेल महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोको करणाऱ्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जमावातील तरुणांनी अचानक दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला.
यात वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे यांच्यासह तीन अधिकारी आणि चार अंमलदार जखमी झाले.
शीव-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक दोन ते तीन तास ठप्प होती.