मुंबई : पक्षाघाताचा झटका आलेल्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास त्याची प्रकृती सुधारण्याची अधिक शक्यता असते. ही बाब लक्षात घेता राज्यातील चार जिल्ह्यांमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये फिरते पक्षाघात केंद्र सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी ७५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून पक्षाघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पक्षाघाताचा झटका आलेल्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. तसेच गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास होणारा त्रास कमी होण्याची शक्यता असते. मात्र अनेक रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचू शकत नसल्याने त्यांना दीर्घकालीन अपंगत्वाला सामोरे जावे लागते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांमधील चार वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये पाच फिरती पक्षाघात केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ती केंद्रे अद्ययावत यंत्रणांनी सज्ज असतील.

हेही वाचा – धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन आणि नियमित करण्यासाठी समिती

मुंबईमध्ये जे.जे. रुग्णालय, पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि चंद्रपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पक्षाघात केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी राज्य सरकारने १५ कोटी असे ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या पाच फिरत्या पक्षाघात केंद्रांच्या उभारणीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून टर्न की पद्धतीने ती सुरू केली जातील.

हेही वाचा – अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाची मुंबईत हत्या, तिघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसाठी सुरू करण्यात येणारी फिरती पक्षाघात केंद्रे नियंत्रण कक्षाशी जोडलेली असतील. एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनी आल्यास फिरते पक्षाघात केंद्र तातडीने रुग्णाच्या पत्त्यावर पोहोचेल. त्यात असलेले डॉक्टर तातडीने रुग्णाची सीटी स्कॅन यंत्राद्वारे तपासणी करतील. त्यात मेंदूमध्ये रक्ताची गुठळी आढळल्यास डॉक्टर तातडीने त्याच्यावर उपचार करतील. योग्य वेळेत रुग्णांना उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. मेंदूला रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळी झाल्याने रक्त प्रवाह थांबतो किंवा रक्तवाहिनी फुटते. त्यामुळे मेंदूचे नुकसान होऊन व्यक्तीला दीर्घकालीन अपंगत्व येण्याची शक्यता असते. फिरती पक्षाघात केंद्रे अतिदक्षता विभागाप्रमाणे काम करतील. त्यामुळे पक्षाघाताचा झटका आल्यानंतर वेळेवर रुग्णालयात पोहचू न शकणाऱ्या रुग्णांसाठी ही केंद्रे वरदान ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.