प्रकरण सुरू ठेवण्यास तक्रारकर्तीच अनिच्छुक असल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई : एका हवाई सुंदरीचा विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी निवृत्त उपायुक्ताविरोधात गेल्या वर्षी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. हा वाद वैयक्तिक असून प्रकरण सुरू ठेवल्यास कोणताही उद्देश साध्य होणार नाही. शिवाय, तक्रारकर्तीला प्रकरण पुढे सुरु ठेवण्यास कोणतेही स्वारस्य नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने निवृत्त पोलीस आयुक्त मधुकर संखे यांना दिलासा देताना नमूद केले.

संखे हे २०१६ मध्ये वरळी मुख्यालयातून निवृत्त झाले होते. गेल्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी त्यांच्याविरोधात माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारकर्ती वास्तव्यास असलेल्या सोसायटीचे संखे हे सचिव होते. जून २०२४ मध्ये सोसायटीच्या इमारतीचे रंगकाम सुरू असताना तक्रारकर्तीच्या गाडी उभी करण्याच्या जागेजवळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा फलक ठेवण्यात आला होता.

याबाबत तिने सर्वप्रथम ऑगस्टमध्ये तक्रार केली होती. वारंवार तक्रारी केल्यानंतरही संखे तिच्याशी ओरडून बोलत असल्याचा आरोप तिने तक्रारीत केला होता. एका महिलेशी बोलण्याची ही पद्धत अयोग्य असल्याचेही आपण निदर्शनास आणून दिले. त्यावर, तू महिला नाहीस, तू तृतीयपंथी आहेस, असे म्हणून संखे रागाने जमिनीवर थुंकून निघून गेल्याचा आरोपही तिने केला होता.

या प्रकारानंतर तक्रारकर्तीने पोलिसांत धाव घेतली आणि संखे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी संखे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षकारांमध्ये आता कोणतेही वैर किंवा द्वेष राहिला नसल्याचे प्रतिज्ञापत्र तक्रारकर्तीने दाखल केले, त्याची दखल घेऊन न्यायालयाने संखे यांच्याविरोधातील विनयभंगाचा गुन्हा रद्द करून त्यांना दिलासा दिला.