कामोठे येथे चार दिवसांपूर्वी दहा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून आईनेच अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने मुलीला दिवा पॅसेंजरमध्ये बसवून हाकलून दिल्याचे समोर आले आहे.
कामोठे येथून दहा वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिची आई पूनम गुप्ता हिने कामोठे पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सात पथके तयार करून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांवर संशय आल्याने पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील मूळ गावी जाऊन अधिक माहिती गोळा केली. त्या वेळी मुलीच्या वडिलांनी दोन वर्षांपूर्वीच जाळून घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली, तर पूनमचे गावातील मुस्तफा या इसमाशी अनैतिक संबंध असल्याने दोन मुलींसह ती पळून गेली असल्याचे समजले.
पूनमने मुस्तफा व त्यांचा मित्र दिनेश यांच्याशी संगनमत करून आपल्या मुलीला दिवा पॅसेंजरमध्ये बसवून सोडून दिले होते. ही मुलगी रेल्वेने दिवा येथील तिच्या चुलतभावाच्या पाणीपुरीच्या स्टॉलवर गेली. तिथून तिच्या भावाने तिला चेंबूर येथे काकाकडे पोहोचवले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मुलीची चौकशी केली. या वेळी आईने आपल्याला सोडून दिल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. यावर पूनमची चौकशी केल्यावर तिने गुन्हय़ाची कबुली दिली असून तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mom and stepdad held in kamothe missing girl case
First published on: 09-07-2015 at 02:33 IST