वडाळा ते सातरस्ता या मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे वडाळा डेपो परिसरातील काम अंतिम टप्प्यात आले असले तरी या कामानिमित्त खणलेले खड्डे, दगडमातीचा राडारोडा, यंत्रसामग्री आदी या ठिकाणी कायम असल्याने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांना यंदाही गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.
अखंड महाराष्ट्र विठ्ठल नामात रंगला असतानाच मुंबईतही प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्येही सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. परंतु जवळपास ४०० वर्षे जुन्या या मंदिरात रस्त्यावरील खड्डे, दगड, माती, पावसामुळे होणारा चिखल यांचा सामना करतच भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागण्याची चिन्हे आहे. येथील वडाळा डेपो परिसरात मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील काम गेली दोन वर्षे सुरू होते. आता येथील जवळपास सर्व काम संपुष्टात आले आहे. मात्र मंदिर ज्या कात्रक मार्गावर आहे तेथील रस्ता सध्या प्रचंड गैरसोयींनी व्यापला आहे.
मंदिर प्रशासनातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढी एकदशीच्या दिवशी येथे जत्रेचेही आयोजन केले जाते. त्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने मुंबईतून भाविक विठ्ठल मंदिरात येत असतात. परंतु या वर्षीही भाविकांना रस्तावरील खड्डे, चिखल, आखुडलेल्या रस्त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी यांचा सामना करत विठुरायाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
मंदिरासमोरच मोनोच्या दादर पूर्वेकडील स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आता येथील स्थानकाखाली गर्दुलेही आश्रय घेऊ लागले आहेत. या सगळ्याचा त्रास वाहतुकीला होतो. पर्यायाने स्थानिकांचीही मोठी गैरसोय होते. त्यातच आषाढी एकादशीच्या दिवशी साधारण २ ते ३ लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी आणि जत्रेसाठी येतात. अनेक दिंडय़ांचेही आगमन या कालावधीत होते. या पाश्र्वभूमीवर आषाढीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा आणि मोनोलाही पत्रे पाठवली आहेत. परंतु त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. यासंबंधी मोनोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आषाढी एकादशीच्या म्हणजेच १४, १५, १६ जुलै या तीन दिवशी बांधकाम बंद ठेवून परिसर मंदिराला मोकळा करून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.