मुंबई : देशभरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच दक्षिण भारताच्या दिशेने मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांजवळील समुद्रसपाटीवर सध्या ढगांच्या हालचाली आणि वाऱ्याचा वेग यामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. हे लक्षण वेळे आधी मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल देत आहे. सामान्यतः मोसमी पाऊस मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या भागात दाखल होतो. मात्र यंदा तो एक आठवडा आधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निकोबार बेटांवर मोसमी पाऊस कधी दाखल होतो, यावरून भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्याची प्रगती, वेग, वेळ, आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे येथील बदलांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.

मोसमी पाऊस १५ मेदरम्यान दाखल होतो

निकोबार बेटांवर मोसमी पाऊस सामान्यतः १५ मेच्या आसपास दाखल होतो. भारतातील मोसमी पावसाचे सर्वप्रथम आगमन होणारा हा भाग आहे. या भागात पूर्वी १० मे, अथवा १८ ते २० मेदरम्यान मोसमी पाऊस दाखल झाला आहे . यंदा मात्र १० मेच्या आसपास मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याआधी १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ आणि २००८ साली १० मे रोजी निकोबार बेटांवर मोसमी पाऊस दाखल झाला होता.

निकोबार बेटांवरील हवामान

निकोबार बेट हे बंगालच्या उपसागरात असून, येथील हवामान उष्ण व दमट आहे. वर्षभर उष्णता आणि आर्द्रता कायम असते. येथे दोन मुख्य पावसाळी हंगाम अनुभवले जातात.

दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस (मुख्य मोसमी पाऊस)

  • सुरुवात: साधारणतः १५ मेच्या आसपास
  • शेवट ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत
  • याच काळात सर्वाधिक पर्जन्यमान होते.
  • अंदमान-निकोबार हा भारताच्या मोसमी प्रवासाचा पहिला टप्पा आहे.

ईशान्य मोसमी पाऊस (हिवाळी पावसाचे काही प्रमाण) :

  • ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान
  • तुलनेत कमी पाऊस, पण दमट हवामान कायम

सरासरी पर्जन्यमान

निकोबार बेटांमध्ये वर्षाला ३०००- ३८०० मिमी पाऊस पडतो, तो भारताच्या इतर भागांपेक्षा अधिक आहे.

भौगोलिक प्रभाव

घनदाट जंगल, जैवविविधता आणि किनारपट्टीवर आधारित जीवनशैली यामुळे पावसाचा येथील जनजीवनावर मोठा प्रभाव असतो. पाऊस लवकर पडल्यास बेटांवरील शेतीला चालना मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाच्या नोंदी

पोर्ट ब्लेअरमध्ये २७ ऑगस्ट २०१६ रोजी २४ तासांत १७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळची २४ तासांतील ती उच्चतम नोंद होती. सामान्यतः अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे २,९६७ मिमी असते. ३० सप्टेंबर २०२३ रोजी दक्षिण अंदमानमध्ये एकत्रित पर्जन्यमान २,२२७.२ मिमी इतके नोंदवले गेले. या बेटांमध्ये पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत असल्याचेही निरीक्षणात आले आहे. विशेषतः, निकोबारमध्ये दरवर्षी सरासरी पर्जन्यमानात २.८४ मिमी वाढ होत असल्याचे एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.