मुंबई : मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच, रविवारी महाराष्ट्राची सीमा ओलांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कर्नाटक, गोव्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात आज, सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून वाटचालीस पोषक स्थिती असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत मोसमी वारे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वारे रविवारी तळकोकणात दाखल झाले. केरळमध्ये वेळेआधीच, शनिवारी दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे २४ तासांच्या आत संपूर्ण गोवा व्यापून मोसमी वारे राज्यात दाखल झाले. पुढील तीन दिवसांत मुंबई, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्य व्यापले जाईल, असा अंदाज आहे.

अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे सर्वात लवकर दाखल झाले आहेत. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. मात्र, वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी देवगडमध्ये हजेरी लावली आहे.

आगमनाचे मुहूर्त

२०१५ – ८ जून

२०१६ – १९ जून

२०१७- १० जून

२०१८- ८ जून

२०१९ – २० जून

२०२० – ११ जून

२०२१ – ५ जून

२०२३ – ११ जून

२०२४ – ६ जून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५ – २५ मे