सर्व देशवासिय ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत तो मान्सून येत्या १७ मे पर्यंत अंदमान-निकोबार द्विपसमुहामध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे येत्या काही दिवसांतच तो दक्षिण अंदमान बेटांवर डेरेदाखल होऊ शकतो.
पण जो मान्सून केरळमध्ये १ जूनला येणार होता तो आता ७ जूनला येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जर मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल झाला असता तर मुंबईत १२ जून पासून पाऊस धारा बरसतील असा अंदाज होता. मात्र आता केरळमध्येच मान्सून उशिरा येणार असल्याने महाराष्ट्रासह देशातील अन्य भागातही मान्सूनचे आगमन लांबणीवर जाऊ शकते.
मान्सून यंदा नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता यापूर्वीच हवामान विभागाने वर्तविली होती. या वेळी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.