मुंबई : मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, समादेशक तसेच शिपायांच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त आहेत. यामुळे मुंबईतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून शासकीय योजनांचा बोजवारा उडाला आहे. या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक, विद्यार्थी व शाळा प्रशासनांकडून करण्यात येत आहे.

रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे शिक्षकांची भविष्यनिर्वाह निधी, वैद्याकीय प्रतिपूर्ती, पदोन्नती यासह अनेक कामे रखडली आहेत. तसेच संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिली आहेत.

मुंबईतील उत्तर विभागामध्ये ५२७, पश्चिम विभागात ७८३ तर दक्षिण विभागात ४१८ अशा एकूण १७२८ शाळा आहेत. यातील उत्तर भागातील शिक्षण उपनिरीक्षकाची सहापैकी चार पदे रिक्त आहेत. सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकाच्या सात पैकी पाच, अधीक्षकांची दोन्ही पदे, कनिष्ठ लिपिकांमध्ये १४ पैकी सात, तर शिपाई पदाची आठ पैकी सहा पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम विभागात शिक्षण उपनिरीक्षकांच्या सहापैकी चार जागा, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकाच्या सहापैकी पाच, वरिष्ठ लिपिकाच्या १२ पैकी सात, कनिष्ठ लिपिकाच्या १६ पैकी नऊ आणि शिपाई पदाच्या १० पैकी ९ जागा रिक्त आहेत. तसेच दक्षिण विभागात शिक्षण उपनिरीक्षकाच्या पाच पैकी चार, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकाच्या पाच पैकी चार, अधीक्षकाच्या दोन्ही जागा, वरिष्ठ लिपिकाच्या १० पैकी पाच, कनिष्ठ लिपिकाच्या १५ पैकी १० जागा रिक्त आहेत.

तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयातील काही लिपिक मंत्रालयात तर काही शिक्षण उपसंचालक कार्यालयात काम करत असल्याने या तिन्ही कार्यालयाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा पदभार नुकताच सांभाळला आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.– राजेश कंकाळ, शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील शिक्षण उपनिरिक्षक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांची अनेक कामे रखडत आहेत. त्यामुळे या जागा तातडीने भरण्यात याव्यात यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.– अनिल बोरनारे, अध्यक्ष, मुंबई मुख्याध्यापक संघटना, उत्तर विभाग