मुंबई…कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानक (वरळी नाका) टप्पा २ अ मार्गिका १० मे पासून वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. या टप्प्याला मुंबईकर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातही सिद्धीविनायक मंदिर स्थानकापर्यंत प्रवास करणाऱयांची संख्या लक्षणीय आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून, म्हणजेच १० ते १८ मे या नऊ दिवसांच्या कालावधी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरुन तब्बल दोन लाख ४ हजार ४२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. दिवसाला या मार्गिकेवरुन २० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. आरे ते बीकेसी मार्गिकेच्या तुलनेत या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या मेट्रो ३ चे काम सुरु आहे. यातील आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पहिल्या टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा २ अ १० मे पासून वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून मेट्रो ३ मार्गिकेचा प्रतिसाद वाढत आहे.
एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार आॅक्टोबर २०२४ ते १८ मे २०२५ या दरम्यान आरे ते आचार्य अत्रे मेट्रो चौक या मार्गिकेवर एकूण ४७ लाख १४ हजार७७२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातील २ लाख ४० हजार ४२ प्रवासी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करणारे आहेत. म्हणजेच बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा २ अ दरम्यान दिवसाला सरासरी २० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. या टप्प्याला मिळणाऱया प्रतिसादामुळे एकूणच आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक या मार्गिकेवरील प्रवासीसंख्या वाढत चालली आहे.
टप्पा २ अ मार्गिकेत सिद्धिविनायक मंदिर स्थानकाचा समावेश आहे. स्थानकापासून सिद्धीविनायक मंदिर पायी दीड ते दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. मंदिरालगतच मेट्रो स्थानक असल्याने त्यातही भुयारी मेट्रो स्थानक असल्याने सांताक्रुझ, बीकेसी, आरे, धारावी येथून सिद्धीविनायक मंदिर स्थानकापर्यंत प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सिद्धीविनायक मंदिर मेट्रो स्थानक प्रवासीसंख्या वाढविण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान आॅगस्टमध्ये आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा टप्पा २ ब वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मेट्रो ३ मार्गिकेला मिळणार्या प्रतिसादात मोठी वाढ होईल अशी आशा एमएमआरसीला आहे.