मुंबई : बिकट आर्थिक स्थिती, ग्रामीण भागात अपुऱ्या सोयी-सुविधा, कुटुंबाची जबाबदारी आदी विविध समस्यांमुळे अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. मात्र आयुष्यातील तारेवरच्या कसरतीत अनेकांना शिक्षणाची आवड स्थिर करून जाते. हेच जाणून पुणे जिल्ह्यातील पिंपरीतील ३१ वर्षांच्या रीना कांबळे यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली आणि ७९.०० टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. विशेष बाब म्हणजे त्यांची मुलगी तन्वी कांबळे हिने याच वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि ७०.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण करता येऊ शकते, हे रीना कांबळे यांनी दाखवून दिले आहे. २००९ साली लग्न झाल्यानंतर रीना कांबळे यांना कुटुंबाच्या जबाबदारीमुळे शिक्षण सोडावे लागले होते आणि पुन्हा शिकण्याची संधी मिळेल, असे त्यांना वाटलेही नव्हते. तेव्हाच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेचा ‘सेकंड चान्स’ हा उपक्रम त्यांच्यासाठी शिक्षणाचे दार पुन्हा उघडणारा ठरला आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा दिली.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा येऊ पाहणाऱ्या सर्व महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम प्रथम एज्युकेशन फाउंडेशन करीत आहे. या संस्थेमार्फत ‘सेकंड चान्स’ हा उपक्रम राबवित दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या बहुसंख्य महिलांचा अभ्यास करून घेतला जातो आणि त्यांच्यासाठी शिकवणीचे विशेष वर्ग राबविले जातात. याच विशेष वर्गाला रीना कांबळे यांनी हजेरी लावत दहावीच्या परीक्षेचा सराव केला. रीना कांबळे यांनी ‘सेकंड चान्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून, तर मुलगी तन्वी कांबळे हिने नियमित शाळेमधून दहावीची परीक्षा दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघींनी घरातील कामे, जबाबदाऱ्या आणि अभ्यास या सर्व गोष्टी सांभाळून एकमेकांना आधार देत इयत्ता दहावीचा अभ्यास केला. आता रीना कांबळे पुढील शिक्षण पूर्ण करण्यास उत्सुक असून त्यानंतर नोकरी करण्याचाही त्यांनी निर्धार केला आहे. आई – मुलीच्या या जोडीच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.