वांद्रे येथील माऊंट मेरीची जत्रा ११ सप्टेंबरपासून सुरू होत असून जत्रेत येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रम सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच युट्युब, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांद्वारे या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिसरातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, भाविकांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रम २६० अतिरिक्त बसगाड्या सोडणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाला निरोप ; गणेश गजरात दुमदुमली मुंबापुरी

मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी परिसराच्या देखरेखीकरीता १०० पेक्षा अधिक सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भाविक या यात्रेला चालतच येतात. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीही करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसराच्या स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कामगारही तैनात करण्यात येणार आहेत. तर भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या एच – पश्चिम विभागातर्फे येथे नियंत्रण कक्षा उभारण्यात आला असून तो यात्रेदरम्यान अव्याहतपणे २४ तास कार्यरत राहणार आहे. याशिवाय अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली असून पार्कींग व्यवस्थेसाठी खाजगी संस्थांना त्यांच्या ताब्यातील मोकळी जागा, शाळांची मैदाने उपलब्ध करण्यास विनंती करण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> वांद्रे येथे गोळीबारात एक व्यक्ती जखमी ; हल्लेखोराचा पसार

बेस्ट उपक्रमानेही अतिरिक्त बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ते १८ सप्टेंबरदरम्यान वांद्रे पश्चिम ते माऊंट मेरी चर्च दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी २६० अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक २०२ मर्या, ३२१ मर्या, ए-३७५ बस, ४२२ आणि सी ७१ या मार्गावर अतिरिक्त बस चालवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त उपनगरातून वांद्रे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी यात्रेच्या कालावधीत आठ दिवस विशेष बस सेवा वांद्रे स्थानक ते हिलरोड गार्डनदरम्यान चालवली जाणार आहे.