ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे-भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही या हल्लासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल”, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा – “…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला!
काय म्हणाले विनायक राऊत?
“भास्कर जाधव हल्ले झेलण्यासाठी समर्थ आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांची लत्करे वेशीवर टांगल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. भास्कर जाधव अथवा शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल”, असा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा – घरावर झालेल्या हल्ल्यानंतर भास्कर जाधवांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “गृहमंत्र्यांकडून आदेश….”
“नारायण राणे आणि भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांविषयीची राजकीय परिस्थिती मांडली म्हणून भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली आहे. शिंदे सरकारकडून आमचे नेते, उपनेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तोंड बंद करण्याचे प्रयत्न होत असेल, तर आम्ही घाबरणार नाही”, असेही ते म्हणाले.