भूसंपादन, निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई : कल्याण पुढे असलेल्या दोनच मार्गिका आणि त्यामुळे लोकल व मेल, एक्स्प्रेस गाडय़ांचे बिघडणारे वेळापत्रक यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यात येणार असून या कामाला आता वेग मिळत आहे. मार्गिकेत अनेक छोटी, मोठी रेल्वे फाटके असल्याने ती बंद करून पाच उड्डाणपूल उभारण्याची योजना असल्याची माहिती एमआरव्हीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय भूसंपादन प्रक्रियेलाही सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.

मुंबई शहरात सर्वसामान्यांना स्वस्तात उपलब्ध नसलेल्या घरांमुळे अनेक जण उपनगरात बोरिवली आणि ठाणे तसेच कल्याणच्या पुढे स्थलांतर होत आहेत. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जतपर्यंत जाणारे आणि तेथून लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. प्रवास करताना लोकलचे वेळापत्रक बिघडल्यास प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होतो. त्यातच गर्दीच्या वेळी लोकलऐवजी मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना प्राधान्य दिल्यावर मनस्तापात भर पडते. कल्याण व त्यापुढील प्रवाशांना असा मनस्ताप गेली अनेक वर्षे सहन करावा लागत आहे. कल्याण व त्यापुढे फक्त दोनच मार्गिका उपलब्ध असल्याने मेल, एक्स्प्रेस आणि लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. परिणामी, सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी वेळापत्रकही कोलमडते. दोन मार्गिका असल्याने लोकल फेऱ्या वाढविण्यावरही मर्यादा येत आहेत.

‘एमआरव्हीसी’ने हा त्रास कमी करण्यासाठी ‘एमयूटीपी ३ ए’अंतर्गत कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी दीड वर्षांपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. करोनाकाळात ही प्रक्रिया मंदावली होती. आता त्याला वेग दिला आहे. भूसंपादन सुरू असतानाच या मार्गिकेदरम्यान पाच उड्डाणपूल उभारण्याची योजना आखली आहे.

भूसंपादनास सुरुवात

मार्गिकेचे संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले असून भूसंपादनाचेही काम सुरू झाले आहे, तर काही कामांसाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात येत आहे. बदलापूरमधील कुळगाव, बेलवली, मोरिवली, चिखलोली भागातील भूसंपादन करावे लागणार आहे.

भविष्यात मोठे मेगाब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका महिन्यात या उड्डाणपुलांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी दिली. कल्याण ते बदलापूर दरम्यान छोटी, मोठी पाच रेल्वे फाटक असून ती बंद केल्याशिवाय मार्गिका होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. फाटक बंद करून पाच उड्डाणपूल उभारण्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी भूसंपादनही करावे लागणार आहे. या कामांसाठी भविष्यात काही मोठे मेगाब्लॉकही घेतले जातील. या प्रकल्पाच्या कामाला काहीशी गती मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.