मुंबई : महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार भरारी पथकांनी एप्रिल ते जून-२०२२ या तीन महिन्यांत तब्बल १३१ कोटी ५० लाखांच्या वीजचोरीची २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली. वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमितता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरुद्ध अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.

सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी दल कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला. उर्वरित बिलांची रक्कमही संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत-२२, पुणे प्रादेशिक कार्यालय-१४, नागपूर प्रादेशिक कार्यालय-१५ तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात- १२ भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर- २०२१ पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या २० भरारी पथकांचा समावेश आहे.