मुंबई: मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच अन्य राज्य सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टरांपेक्षा कमी विद्यावेतन मिळते. एकसमान सेवा देण्यात येत असताना डॉक्टरांना कमी विद्यावेतन देणे हा अन्याय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उपनगरीय रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटनेकडून (एमएसआरडीए) करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या शताब्दी (कांदिवली) आणि शताब्दी (गोवंडी), भाभा (कुर्ला) आणि भाभा (वांद्रे), राजावाडी रुग्णालय, व्ही.एन. देसाई रुग्णालय, एमटी अग्रवाल अशा मुंबईतील उपनगरातील रुग्णालयांमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत वरिष्ठ निवासी डॉक्टरांप्रमाणेच रुग्णसेवा देतात. पदव्युत्तर पदवी, जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रियेतील समानता असतानाही केईएम, शीव, नायर आणि कूपर या वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि त्यांच्या विद्यावेतनात प्रचंड तफावत आहे.
या डॉक्टरांना त्यांच्या अन्य सहकाऱ्यांपेक्षा दरमहा ३० ते ४० हजार कमी वेतन दिले जाते. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डाॅक्टरांना ९६ हजार, मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील डॉक्टरांना १ लाख रुपये, ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना १ लाख २० हजार विद्यावेतन मिळते. मात्र उपनगरीय रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टराना ६४ हजार विद्यावेतन दिले जाते.
आपत्कालीन शस्त्रक्रिया करणे, अतिदक्षता विभाग, प्रचंड गर्दीचा बाह्यरुग्ण विभाग सांभाळणे अशा सुविधा त्यांना द्याव्या लागतात. बहुतेकदा इतर जिल्ह्यांमधून आणि राज्यांमधून मुंबईत आलेल्या डॉक्टरांना मिळणाऱ्या कमी विद्यावेतनामुळे त्यांना रुग्णालयापासून दूर भाड्याच्या घरात राहावे लागते. त्यांचा बराचसा वेळ प्रवासात जातो. याचा परिणाम त्यांच्या सेवेवर होतो. उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर काम करण्यास तयार नसतात. त्यातच मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे उपनगरीय रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे डॉक्टरांच्या विद्यावेतनात असलेली ही तफावत कमी करण्यासाठी एमएसआरडीएने रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी समान विद्यावेतन लागू करण्याची मागणी केली आहे. मुंबईकरांच्या उपनगरातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावे, असे महाराष्ट्र वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटनेचे डाॅ अभिजीत हेलगे यांनी सांगितले.