मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्यातील नऊ प्राचिन मंदिरांच्या जतन – संवर्धनाचा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाअंतर्गत सध्या खंडोबा मंदिर, पुरुषोत्तम मंदिर, धूतपापेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनाची कामे वेगात सुरू आहेत. आता लवकरच आणखी दोन मंदिरांच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

गडचिरोलीतील मार्कंडा मंदिर आणि अमरावतीतील आनंदेश्वर मंदिरांच्या कामासाठी भारतीय पुरातत्व खात्याकडून परवानगी मिळाली असून या दोन्ही मंदिरांच्या जतन-संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीसीने नुकत्याच या दोन्ही मंदिरांच्या जतन-संवर्धनाच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, या कामाअंतर्गत आनंदेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने प्राचिन मंदिरे असून अनेक मंदिरांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे पुरातन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील नऊ प्राचिन मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २०२१ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाची जबाबदारी एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार नाशिकमधील गोंदेश्वर, कार्ला येथील एकवीरा, औरंगाबादमधील खंडोबा, गडचिरोलीमधील शिव मंदिर मार्कंडा, माजलगावमधील (बीड) भगवान पुरुषोत्तम मंदिर, कोल्हापूरमधील कोपेश्वर, अमरावतीमधील आनंदेश्वर शिव मंदिर, उत्तेश्वर (सातारा) आणि राजापूरमधील (रत्नागिरी) धूतपापेश्वर या नऊ मंदिरांचा चार सल्लागारांच्या माध्यमातून सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

हा आराखडा मंजूर करून घेत कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र एमएसआरडीसीने २०२३ मध्ये केवळ खंडोबा मंदिर, पुरुषोत्तम मंदिर आणि धूतपापेश्वर या तीन मंदिरांच्याच कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. पुढे या मंदिरांच्या कामाला सुरुवातही करण्यात आली. मात्र त्याचवेळी गोंदेश्वर मंदिर, एकवीरा मंदिर, शिव मंदिर मार्कंडा, कोपेश्वर मंदिर आणि आनंदेश्वर शिव मंदिर ही पाच मंदिरे भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असून त्यांनी कामास मंजुरी देण्यास नकार दिला होता.

त्यामुळे या मंदिरांचे जतन-संवर्धन रखडले होते. पण आता मात्र भारतीय पुरातत्व खात्याकडून एका-एका मंदिरास परवनागी मिळू लागली असून या मंदिरांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने याआधीच एकवीरा मातेच्या मंदिराच्या कामास मंजुरी दिल्याने एमएसआरडीसीने २६ कोटी ८५ लाख रुपये कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. आता आणखी दोन मंदिरांच्या कामासाठी दोन दिवसांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

मार्कंडा मंदिराच्या जतन-संवर्धनाच्या १४ कोटी ५६ लाख ३५ हजार ६१० रुपयांच्या कामासाठी आणि आनंदेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धन-जीर्णोद्धाराच्या ८ कोटी ८५ लाख ८५ हजार ७६९ रुपयांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुकांना २४ मार्चपर्यंत निविदा सादर करता येणार असून २४ मार्च रोजी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील महत्त्वाच्या अशा मार्कंडा आणि आनंदेश्वर मंदिरांसह एकवीरा मातेच्या मंदिराच्या कामालाही सुरुवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मंदिरांची कामे सुरू असून तीन मंदिराच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर एका मंदिराच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अद्याप होणे बाकी आहे. उर्वरित सर्व मंदिरांच्या कामालाही लवकरात लवकर सुरुवात करण्यात येणार आहे, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.