मुंबई : मिळालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला निरीक्षण-अभ्यासातून वेगळेपण देत ती सहज अभिनयाने जिवंत करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांची ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधील ‘सुलतान’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण देणारी ठरली. त्यानंतर ‘मिर्झापूर’मधील कालीन भैय्यापासून ‘ओएमजी २’मधील कांतीशरण मुद्गलपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ‘वासेपूर’आधीचा त्यांचा संघर्ष आणि त्यानंतर बॉलिवूडमधील वलयांकित कारकिर्द या दोन्हींचा उलगडा यंदाच्या ‘लोकसत्ता गप्पा’ पर्वात होणार आहे.

हेही वाचा >>> रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना आता पाच लाख रुपये; तब्बल ११ वर्षांनी भरपाई रकमेत दहापटीने वाढ

 हिंदी चित्रपटसृष्टीत शिफारशींचे ‘पाठबळ’ नसताना आपल्या अभिनयगुणाने नावलौकिक कमावलेल्या पंकज त्रिपाठी यांच्या यशाची आख्यायिका रोचक आहे. बिहारमधील छोटय़ाशा गावात शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या पंकज यांना चित्रपटगृह म्हणजे काय हेही माहिती नव्हते. गावात वीजही नव्हती. शेतीची कामे, नदीत मनसोक्त डुंबणे, मित्रांबरोबर गाव भटकणे असे निसर्गाच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झालेल्या पंकज यांना अभिनय क्षेत्रात यावे, एनएसडीमध्ये अभिनयाचे शिक्षण घ्यावे हे सुचले तरी कधी आणि कसे, हे त्यांच्याचकडून जाणून घेता येणार आहे. ‘लोकसत्ता गप्प’’चे हे सत्र  रविवारी, २४ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.    ‘एनएसडी’मध्ये २००४ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा एका चहाच्या जाहिरातीत त्यांनी भूमिका केली. एखाददुसऱ्या  चित्रपटात भूमिकाही केली, त्यानंतर आठ वर्षे त्यांच्याकडे काम नव्हते. तरीही अभिनेता होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द न सोडणाऱ्या पंकज त्रिपाठींनी नंतर आलेल्या संधीचे अक्षरश: सोने केले. दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या या अभिनेत्याची प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांचे संवाद प्रेक्षकांमध्ये, समाजमाध्यमांवर प्रचंड लोकप्रिय आहेत. चित्रपटसृष्टीचा तथाकथित नायक नसलेला हा अभिनेता खऱ्या अर्थाने त्याच्याकडे आलेल्या चित्रपटांचा, वेबमालिकांचा हिरो ठरला आहे. अभिनेते मनोज वाजपेयी यांची चप्पल स्वत:कडे ठेवून एकलव्याप्रमाणे गुरू म्हणून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गोष्ट असो वा सध्या मुंबईतील त्यांच्या बंगल्यात आपला गाव वसवण्याचा त्यांचा प्रयत्न असो.. असंख्य किस्से, पडद्यामागच्या गोष्टी या खास गप्पांमधून वेचता येणार आहेत.