मुंबई : धारावीतील रहिवाशांचे मिठागरांच्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसन होऊ देणार नाही, असा इशारा मुलुंडवासीयांनी दिला आहे. यासाठी जनआंदोलन आणखी तीव्र करण्याबरोबरच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही सुरू आहे.
धारावी पुनर्वसन योजनेंतर्गत अपात्र रहिवाशांकरिता गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील मिठागरांचे भूखंड हस्तांतरित करण्याचा निर्णय योग्य ठरविताना उच्च न्यायालयाने अलीकडेच याचिका फेटाळली होती. असे असले तरी मुलुंडमधील मिठागराच्या जागेवर धारावीकरांसाठी घरे बांधण्यास विरोध कायम असून घरे उभारण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा देत जनआंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचे मुलुंडचे रहिवासी मोहन सावंत यांनी सांगितले. आगामी काळात मानवी साखळी, निदर्शने, उपोषण, जनजागृती मोहीम अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून विरोध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार असून तेथे आपल्याला निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास याचिकाकर्ते अॅड. सागर देवरे यांनी व्यक्त केला.
त्याचवेळी रस्त्यावरची लढाईदेखील सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. धारावीसह कुर्ला, विक्रोळीतील रहिवासीदेखील आपल्याबरोबर असून येत्या काळात ते आंदोलनात सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला. कामास सुरुवात केल्यास हजारोंच्या संख्येने मुलुंडकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा रहिवासी अमोल गुप्ते यांनी दिला.