शिक्षण विभागाने घेतलेल्या कल चाचणीतील निष्कर्ष; मुंबई पट्टय़ातील ४६ हजार विद्यार्थ्यांना कृषीअभ्यासात गोडी

घरातील अनेक पिढय़ा शेतावर राबूनदेखील होणारी आर्थिक ओढाताण पाहून ग्रामीण भागातील मुलांना शहरातील नोकऱ्या खुणावत असल्या तरी, सिमेंटकाँक्रिटच्या जंगलात वाढलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांतील मुलांना मात्र कृषी क्षेत्र साद घालत आहे. दहावीतील विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्रातील करिअरकडे कल आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या कलचाचणीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल ४६ हजार मुलांनी शेतीच्या अभ्यासात रस दाखवला आहे.

विद्यार्थ्यांना आपला कल ओळखून दहावीनंतरची पुढील वाट निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते. या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने नुकतेच जाहीर केले. राज्याप्रमाणेच मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा वाणिज्य शाखेकडे आहे. मात्र मुंबई आणि परिसरात शिकणाऱ्या १७ टक्के म्हणजे ४६ हजार ७४६ विद्यार्थ्यांचा कल कृषी क्षेत्राकडे आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडय़ातील विभागांबरोबरच कोल्हापूर, पुणे या भागांपेक्षाही कृषी क्षेत्राकडे कल असलेले विद्यार्थी मुंबईत जास्त आहेत. शेती नजरेलाही अभावानेच पडावी

अशा मुंबईतील विद्यार्थ्यांचा शेतीकडे असलेला कल शिक्षक आणि पालकांनाही गोंधळात टाकतो आहे.

मुंबई विभागातील सर्वाधिक म्हणजे ५८ हजार ३०२ (२१ टक्के) विद्यार्थी हे वाणिज्य शाखेकडे कल असलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील हा कल यंदाही टिकून आहे. अकरावीच्या प्रवेशासाठीही वाणिज्य शाखेत सर्वाधिक प्रवेश मुंबईत होतात. दुसऱ्या क्रमांकावर मात्र शेती बरोबरच ललित कलांचे क्षेत्र आहे. ललित कलेकडेही १७ टक्के म्हणजे ४६ हजार विद्यार्थ्यांचा कल आहे.

गणवेशधारी किंवा प्रशासकीय सेवेत ४० हजार ५२१ विद्यार्थी (१४ टक्के) करिअर करू इच्छितात. आरोग्य विज्ञान विषयांमध्ये ३१ हजार ८३१ विद्यार्थी (११ टक्के) आणि कला विषयांमध्ये ३० हजार २५० विद्यार्थ्यांचा (११ टक्के) कल आहे. एकेकाळी नोकरीची हमी देणाऱ्या तांत्रिक शाखा गेल्या काही वर्षांमध्ये डबघाईला आल्यानंतर त्याकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढाही कमी झाला आहे. मुंबईतील २५ हजार २१९ (९ टक्के) विद्यार्थ्यांचा कल तांत्रिक शाखांकडे आहे.