मुंबई : नेहमीप्रमाणे टपरीवर आलेल्या ६० वर्षीय महिलेचा बुधवारचा चहा शेवटचा ठरला. तिच्या परिचयाच्या मर्सिडीज चालकाने तिला चहा पाजला आणि अवघ्या काही मिनिटात तिच्या अंगावर गाडी घातली. ही महिला चहा पित गाडीलगत खाली बसली होती. अनावधाने चालकाकडून हा अपघात झाला.

वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या कस्तुरबा चव्हाण (६) यांना भरत (४२) आणि नागेश (४५) अशी दोन मुले आहेत. दररोज सकाळी ती घरावजळच्या वांद्रे पश्चिमेच्या चिंबई येथील चहाच्या टपारीवर चहा पिण्यासाठी जात होती. तिथे अनेक जण चहा पिण्यासाठी येतात. तेथे तिची ओळख जीवा मुनेचा (४१) या चालकाशी झाली. तो खारदांडा येथील रहिवासी आहे. तो एका व्यापाऱ्याची मर्सिडिज गाडी चालवत होता. रोज सकाळी तो कस्तुरबा यांना चहा पाजायचा. त्यानंतर तो गाडी घेऊन मालकाकडे कामासाठी जायचा.

आधी दिला चहा, मग धडक…

कस्तुरबा नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी जलदर्शन इमारतीजवळील चहाच्या टपरीवर आली होती. नेहमीप्रमाणे जीवा तेथे मर्सिडीज गाडी घेऊन आला. त्याने तिला चहा दिला. तिला ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर कस्तुरबा चहाचा कप घेऊन गाडी समोर खाली बसली. दरम्यान, जीवा निघाला आणि त्याने गाडी सुरू केली. मात्र मर्सिडीज उंच असल्याने त्याला गाडीसमोर बसलेली कस्तुरबा दिसली नाही. त्याने गाडी सुरू केली आणि कस्तुरबा गाडीखाली चिरडली.

रुग्णालयात दाखल केले, पण उशीर झाला

या अपघातामुळे एकच खळबळ उडाली. जीवा गाडीतून उतरला आणि त्याने हितेश पटेल (२३) याच्या मदतीने कस्तुरबाला रिक्षात बसवून भाभा रुग्णालयात नेले. मात्र कस्तुरबाला दुखापतीमुळे रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कस्तुरबाचा मुलगा भरत चव्हाण याच्या तक्रारीवरून चालक जीवा मुनेचा याच्याविरोधात मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८४ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला.

अपघात अनावधानाने

याबाबत माहिती देताना वांद्रे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भारती यांनी सांगितले की, आम्ही चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र हा अपघात त्याच्याकडून अनावधानाने झाला आहे. घटनास्थळावरील सीसी टीव्ही चित्रण आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून या गोष्टी स्पष्ट झाल्या आहे. मर्सिडीज उंच असल्याने त्याला खाली बसलेली कस्तुरबा दिसली नाही आणि हा अपघात झाला, असे भारती यांनी सांगितले.

चालकालाही अश्रू अनावर

जीवा मुनेजा कस्तुरबाला आई मानत होता. रोज तिला चहा देऊन ख्यालीखुशाली विचारायचा. काही मिनिटांपूर्वी चहा दिला आणि लगेचच अपघात झाला याचे शल्य त्याला आहे. आपल्यामुळे आईसमान महिलेचा मृत्यू झाल्याने त्याचेही डोळे पाणावले होते, असे पोलिसांनी सांगितले.