मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ५३६ आणि इयत्ता ८ वीच्या ४१८अशा एकूण ९५४ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी या परीक्षेत महानगरपालिकेचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. ही परीक्षा यंदा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा तसेच निकालात वृद्धी व्हावी, यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवित असतो. गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख उंचावत आहे.
यंदा सन २०२५ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतून ५३६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, तर इयत्ता आठवीतून ४१८ विद्यार्थ्यांना असे एकूण ९५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. सन २०२४ मध्ये इयत्ता ५ वीच्या ३१७, तर इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. यंदा इयत्ता ५ वीच्या रिद्धी कमलेश मिश्रा ( वाकोला हिंदी मनपा हिंदी शाळा क्र.२) या विद्यार्थिनीने ७९.१९ टक्के गुण मिळवून महानगरपालिका शाळेमधून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच रोशनी संतोष तिवारी (वाकोला हिंदी मनपा हिंदी शाळा क्र. २) या विद्यार्थिनीने ७७.८५ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि श्वेता अवधेश तिवारी (बंदरपाखाडी एमपीएस शाळा) या विद्यार्थिनीने ७६.५१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
इयत्ता ८ वीच्या शेख मोहम्मद उमर मोहम्मद सलीम ( देवनार कॉलनी शाळा) या विद्यार्थ्याने ७९.७२टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर, अंश दिलीप यादव (दिंडोशी वसाहत मनपा हिंदी शाळा क्र. २) या विद्यार्थ्याने ७८ टक्के व स्वीटी अनिलकुमार पाधी (काजूपाडा मनपा हिंदी क्र.१) या विद्यार्थिनीने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. सन २०१६-१७ पासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरुपात आमुलाग्र बदल झाले आहेत. परीक्षेचे कामकाज स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेश पत्र आणि निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असते. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकाही ओएमआर पद्धतीने तपासली जाते.