पिंपरी : ऑनलाइन टास्क देऊन फसवणूक करणारी आणि पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील रहिवाशांची विविध बँकांमध्ये खाती उघडून त्या खात्यांची माहिती सायबर चोरट्यांना उपलब्ध करून देणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. खातेधारकाला प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन खाते वापरले असून, ५० खात्यांद्वारे २० कोटींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अल्ताफ मेहबूब शेख (वय २४, जुनी सांगवी), मनोज शिवाजी गायकवाड (२३), हाफिज अली अहमद शेख (दोघे रा. दापोडी), अनिकेत भाऊराव गायकवाड (वय २२, रा. नवी सांगवी), पवन विश्वास पाटील (वय २२, रा. पिंपरी), चैतन्य संतोष आबनावे (वय २१), सौरभ रमेश विश्वकर्मा (वय २३, दोघे रा. पिंपळे गुरव) आणि कृष्णा भगवान खेडकर (वय २७, रा. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

रावेत येथील एका व्यक्तीला फेब्रुवारीत समाजमाध्यमातील व्हॉट्सॲपवर अर्धवेळ नोकरीची लिंक आली होती. ती उघडल्यानंतर ते एका टेलिग्राम समूहात आपोआप समाविष्ट झाले. टास्क खरेदी करून पूर्ण केल्यास दीड हजार रुपये नफा मिळेल, असे सांगितले. समूहातील इतर सदस्यांनी मिळविलेल्या नफ्याची माहिती टाकली. त्यामुळे त्यांनी ३३०० रुपयांना टास्क खरेदी केले आणि ते पूर्ण केल्याने ५०० रुपये नफा दाखविण्यात आला. मात्र, गुंतवणूक, तसेच नफ्याची रक्कम न मिळाल्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच वेळी कर्नाटक बँकेचे पिंपरी शाखेच्या व्यवस्थापकांनी बँकेमध्ये ३४ पेक्षा अधिक खाती दोन महिन्यांत उघडण्यात आले असून, त्यामध्ये संशयास्पद व्यवहार होत असल्याचे पोलिसांना कळविले होते. खाते उघडणारे आणि खाते उघडण्यास लावणारे शहरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कर्नाटक बँकेतील खातेधारक अल्ताफ याने मनोज आणि अनिकेतच्या सांगण्यावरून बँकेत दोन खाती उघडली. ती खाती मनोजला देऊन त्यापोटी चार हजार रुपये घेतल्याचे सांगितले. मनोजने ही खाती हाफिजला सायबर फसवणुकीसाठी दिल्याचे आणि त्या बदल्यात प्रत्येक खात्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. पवन याने चैतन्यच्या सांगण्यावरून खाते उघडले असून, त्या बदल्यात दोन हजार रुपये घेतले. चैतन्यने हे खाते सौरभला दिले. त्यापोटी दीड हजार रुपये घेतले. सौरभने ही खाती कृष्णाला दिली. त्या बदल्यात प्रत्येक खात्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – मुंबई : वडाळ्यात खारफुटीच्या कत्तलीप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आरोपींनी खातेधारकाला प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन त्यांच्या नावावर कर्नाटक बँक, फेडरल, इक्विटास आणि साउथ इंडियन बँकांमध्ये खाती उघडली. खातेधारकांबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, किरण आणि हाफिज ज्यांना खाते देत होते, त्यांचा शोध सुरू आहे. ५० पेक्षा अधिक बँक खात्यांद्वारे १६ तक्रारी राज्यात प्राप्त झाल्या आहेत. या खात्यांद्वारे २० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींना फेडरल बँकेची खाते उघडून देणाऱ्यांची चौकशी सुरू असून, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तपास करत आहेत.