मुंबई विमानतळावर कार्यरत अधिकाऱ्याची कूट चलनात (क्रीप्टो करन्सी) गुंतवणुकीच्या नावाखाली सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक परिमंडळाच्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. चांदिवली येथे वास्तव्यास असलेले तक्रारदार मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणेत मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. त्यांना गेल्यावर्षी ११ डिसेंबर रोजी नोकरी मिळवून देणाऱ्या संस्थेतून ब्रीशा नावाच्या महिलेचा संदेश आला होता. तिने यू ट्यूबवरील चित्रफीतींना ‘लाईक’ करून पैसे करवण्याची नोकरी असल्याचे सांगितले.

हेही वाचा- मोफत शस्त्रक्रिया करून ओबडधोबड नाक सरळ करण्याची सर्वसामान्यांना संधी

तक्रारदाराने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महिलेने काही चित्रफीतींच्या लिंक त्यांना पाठवल्या. महिलेने केलेल्या सूचनेनुसार त्यांनी चित्रफीत ‘लाईक’ करून त्याचे छायाचित्र ‘रिसेप्शनिस्ट रिया’ आणि ‘वर्किंग टास्क ग्रुप’ या टेलिग्राम चॅटिंग ग्रुपवर पाठवले. सुरूवातीला तक्रारदाराला ठरल्याप्रमाणे रक्कम मिळाली. त्यानंतर त्या टेलिग्राम ग्रुपवर एक संदेश आला होता. कमाई करण्यासाठी कूट चलनात गुंतवणूक करण्याबाबत तो संदेश होता. तक्रारदारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर त्यांना एका संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर त्याला यूपीआय खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्याने रक्कम जमा केली. ती रक्कम ॲप्लिकेशनच्या खात्यावर जमा होत असताना दिसत होते. चांगला नफा देण्यासाठी तक्रारदाराला मोठी रक्कम जमा करण्याची सूचना करण्यात आली. त्याने सांगितल्याप्रमाणे रक्कम जमा केली. रक्कम जमा झाल्याचे नोंदणीपत्रही त्यांना पाठवण्यात आले. पण रक्कम काढता येत नसल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा तक्रारदारांना संशय आला.

हेही वाचा- धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर त्यांनी याप्रकरणी बीकेसी पोलिसांकडे तक्रार केली. पण तोपर्यंत त्यांनी पाच लाख ८५ हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले होते. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांनी भादंवि व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक, तोतयागिरी, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस साधारणपणे १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास करतात, परंतु या प्रकरणात मोठ्या आणि सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय असल्याने सायबर पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.