मुंबई : जुहू पोलिसांनी अभिनेत्री आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहायिका (पर्सनल असिस्टंट) वेदिका प्रकाश शेट्टी (३२) हिला फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. तिच्यावर ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही रक्कम आलिया भट्ट यांच्या वैयक्तिक खात्यांमधून आणि त्यांच्या ईटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या निर्मिती संस्थेतून वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. शेट्टी हिला बंगळुरू येथे अटक करून पाच दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे. तिला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत करण्यात आली होती. आलियाची आई आणि ईटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स प्रा. लि.ची संचालक सोनी राजदान यांनी याप्रकरणी २३ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वेदिका शेट्टीविरोधात विश्वासघात आणि फसवणुकीच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५ महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा पाठपुरावा करीत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टी अंधेरीच्या मरोळ येथील रहिवासी असून आलियाची सचिव म्हणून ती आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळत होती. त्या पदाचा गैरवापर करून तिने कंपनी आणि आलिया यांच्या खात्यांमधून पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.