मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्ग – पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास अतिजलद, सिग्नलमुक्त करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर गुरुवारी पूर्ण झाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्त्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर काही मिनिटांतच हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उन्नत रस्ता खुला झाल्याने आता अमर महल जंक्शन – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास ३० ते ३५ मिनिटांत करता येणार आहे. मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. तर दुसरीकडे एमएमआरडीएच्या कलानगर जंक्शन येथील धारावीकडून वांद्रे – वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर हा पुलही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे आता बीकेसी, कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प बांधला. पुढे या रस्त्यावरून बीकेसी आणि वाकोल्याला अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ – चेंबर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कपाडिया नगर – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्गदरम्यान ३.०६ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यातील कपाडिया नगर – वाकोला नाला उन्नत रस्ता पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाला. मात्र वाकोला नाला – पानबाई शाळा अशा १.०२ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाले तरी हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे प्रवासी – वाहनचालकांमध्ये नाराजी होती. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे यांनीही हा उन्नत रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या प्रकल्पाचे लोकार्पण रखडल्याचे सांगितले जात होते.

आता मात्र या उन्नत रस्त्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा संपली असून गुरुवारी उन्नत रस्त्याचे लोकार्पण करून हा पूल तात्काळ सेवेत दाखल करण्यात आला आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यामुळे वाहनचालक-प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाकोल्यातील, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. अमर महल जंक्शन – पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास सुसाट होणार आहे.

बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने कलानगर जंक्शन येथे तीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी एक धारावीकडून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम शिल्लक होते. त्यानुसार नुकतेच एमएमआरडीएकडून उड्डाणपुलाचेही काम पूर्ण झाले होते. मात्र या उड्डाणपुलाचे लोकार्पण रखडले होते. पण आता हा पुलही गुरुवारी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता धारावीकडून सागरी मार्गाकडे जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.