मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घाटकोपर येथील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे या कामासाठी महिन्याभरात निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. स्मारकासाठी हटवाव्या लागणाऱ्या झोपड्यांची पात्रता निश्चिती अंतिम टप्प्यात असून या झोपड्या हटविण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे चिरानगर येथे घर आहे. या घरांचे जतन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारधण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाे घेतला आहे. महिन्याभरात स्मारकाच्या कामासाठी निविदा काढण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाने घेतला आहे. सध्या निविदा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या स्मारकाचे काम दोन भूखंडावर करण्यात येणार असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. या दोन्ही भूखंडावर एकूण ६८५ झोपड्या आहेत. या झोपड्या हटविल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे. झोपु प्राधिकरणाने अखेर झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण केले असून पात्रता निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात या झोपड्या हटविण्याच्या कामालाही सुरुवात होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्मारकाचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला असला तरी प्रारंभी हा प्रकल्प सामाजिक न्याय विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत होता. मात्र मार्च २०२४ मध्ये राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करून सदर प्रकल्प झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेतल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. ही जबाबदारी आल्यानंतर झोपु प्राधिकरणाने सल्लागार नेमून स्मारकाच्या कामाला सुरुवात केली. आता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याच्यादृष्टीने वेगात हालचाली सुरू झाल्या आहेत. महिन्याभरात स्मारकाच्या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. तर झोपड्या हटविण्याच्या कामालाही महिन्याभरात सुरुवात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही कामे झाल्यानंतर कंत्राट अंतिम करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.