दोन हजार रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड तयार करून देणारा आरोपी महेंद्र किशोर मानमोंडे याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. महेंद्रने अनेकांना बनावट आधारकार्ड दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडे पोलिसांनी काही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे शिक्के, बंद झालेल्या शिक्षण संस्थेचे अर्ज आणि आधारकार्ड नोंदणी पावत्या सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
महेंद्र हा कांदिवलीतील आकुर्ली रोड, क्रांतीनगरच्या पंचशील चाळीत राहतो. कुठलीही कागदपत्रे न देता तो बनावट आधारकार्ड बनवून देत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडे एका तोतया ग्राहकाला आधारकार्ड काढण्यासाठी पाठविले होते. त्या व्यक्तीने त्याच्याकडे आधारकार्डविषयी माहिती विचारुन त्याला आधारकार्डची गरज असल्याचे सांगितले. यावेळी महेंद्रने त्याच्याकडून आधारकार्डसाठी दोन हजार रुपये घेतले. आधारकार्डसाठी त्याने एका बंद झालेल्या शिक्षण संस्थेच्या लेटरहेडचा वापर केला होता. त्यानंतर त्याने त्याला एका बँकेत नेले. तेथे त्याच्या हाताचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नीट होत नसल्याने त्याने त्याला दुसर्या बँकेत नेले. हा प्रकार उघडकीस येताच महेंद्रला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आतापर्यंत अनेकांना दोन हजार रुपयांत आधारकार्ड बनवून दिल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी काही राजकीय नेत्यांच्या शिक्क्यासह आधारकार्ड नोंदणीच्या पावत्या आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. महेंद्रने आतापर्यंत किती लोकांना बोगस आधारकार्ड बनवून दिले आहेत याचा पोलीस तपास करीत आहेत.