मुंबई : आपली संस्कृती मातृदेव भवं, पितृदेव भवं, गुरुदेव भवं ही आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना गुरू कोण, हे कळलेले नाही. त्यांचे गुरू दिल्लीत बसले असून गुरूंच्या आज्ञेवरून आपल्यावर अन्याय सुरू आहे, अशी टीका बुधवारी शिक्षक आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, एकजुटीने सोबत उभे राहिलात, तर हक्काचे दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी शिक्षकांना दिले.
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक संतप्त झाले असून त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात मंगळवारी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यांनतर गिरीश महाजन यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. राजकीय पाठिंबा मिळत असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नुकतेच उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनात भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला.
आझाद मैदानात गिरणी कामगारही आंदोलनासाठी आले आहेत. आपण इथे व्यथा मांडत आहोत. मात्र, महाराष्ट्रातील भूमिपूत्र, मराठी माणसांना चिरडून टाकण्याचा विडा दिल्लीच्या गुलामांना घेतला आहे. आपण सर्वांनी एकवटून त्यांना एकच धडा शिकवायला हवा, असे ठाकरे यांनी सांगितले. मी शिक्षकांच्या एकजुटीचे कौतुक करायला या आंदोलनात आलो आहे. शिवसेना (ठाकरे) पूर्ण ताकदीने शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून हा लढा जिंकेपर्यंत सोबत उभी राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांना दिले. तसेच, लवकरच याच आझाद मैदानात विजय साजरा करायला पुन्हा भेटू, असेही त्यांनी नमूद केले. आझाद मैदानात माईकची व्यवस्था बंद करण्यात आल्याने ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. तसेच, आपला आवाज कोणीही बंद करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार कालपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत . मंगळवारी रात्रभर त्यांनी आझाद मैदानात मुक्काम केला. त्यांच्यासह जयंत आसगावकर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षक आमदार ज. मू. अभ्यंकर, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सकाळी आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली.