मुंबई : सात वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरवले व त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आमदार असल्याने त्यांना मारहाण करण्याचा परवाना मिळाला नाही, अशी टिप्पणीही विशेष न्यायालयाने त्यांना आरोपांत दोषी ठरवताना केली.
कडू यांना त्यांच्यावरील आरोपांत दोषी ठरवून शिक्षा सुनावताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी त्यांना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला. तथापि, कडू यांच्याकडून या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईपर्यंत विशेष न्यायालयाने त्यांची शिक्षा स्थगित केली. तसेच, त्यांना जामीनही मंजूर केला. कडू यांनी २६ सप्टेंबर २०१८ रोजी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक प्रदीप पी यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. नंतर, शाब्दिक वादानंतर कडू यांनी मारहाण केली होती, असा त्यांच्यावर आरोप होता.
न्यायालयाने कडू यांना सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे किंवा त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि धमकावणे या आरोपांत दोषी ठरवले. तर हेतुत: अपमान करण्याच्या आरोपातून मात्र त्याची निर्दोष सुटका केली.
निःसंशयपणे, एखाद्या विशिष्ट विभागाच्या कारभाराबद्दल किंवा व्यवस्थापनाबद्दल किंवा सरकारच्या भरती प्रक्रियेदरम्यान परीक्षा घेण्याबद्दल तक्रारी असू शकतात. परंतु कोणताही लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्याच्यावर हिंसक हल्ला करेल, अधिकाऱ्याला धमकावेल आणि त्याचे काम विस्कळीत करेल असा त्याचा अर्थ होत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने कडू यांना दोषी ठरवताना नोंदवले.
आरोपी केवळ विद्यमान आमदार आहे म्हणून त्यांना, तक्रारदाराला धमकावण्याचा किंवा त्याच्या कार्यालयात हल्ला करून त्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा कोणताही अधिकार नव्हता, असे देखील न्यायालयाने निकालात नमूद केले.