कृषीप्रधान देशात नेमके शेतकऱ्यालाच अनेक ठिकाणी मागे ठेवले जात असल्याचे चित्र आज आपल्याला पाहावयास मिळत आहे. मुलांच्या शिक्षणापासून उद्योगांच्या विकासापर्यंत विविध स्तरावर सरकारी योजना येत असतात. शेतीसाठीही सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र शेतकरी पारंपरिक शेतीतच रमला तर त्याचा विकास कसा होईल? यासाठी त्याने विविध प्रयोग आणि शेतीमध्ये काळानुरूप बदल केले पाहिजेत. यासाठी त्याला माहिती पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. अनेकदा शेतकऱ्यांना माहिती पोहचवण्यासाठी सरकारी पातळीवर विविध कार्यक्रम हाती घेतले जातात मात्र ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांना ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देऊन त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ‘देस्ता ग्लोबल’ या कंपनीने पुढाकार घेतला आणि यासाठी त्यांनी ‘देस्ता टॉक’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले. याचबरोबर शेतकरी आणि बियाणे विक्रेते यांच्यातील दुवा होऊन ‘देस्ता मार्ट’ही सुरू केले आहे. या देस्ता मार्टमध्ये दहा टक्के सवलतीत विविध उत्पादने उपलब्ध करून दिली जात आहेत.

अशी झाली सुरुवात

कृषीप्रधान देशातील शेतकरी काळाच्या मागे राहू नये यासाठी त्यांना काळाबरोबर घेऊन जाणे आवश्यक होते. यासाठी काहीतरी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक होते. ही गरज रोनाल्ड बोहम आणि निशांत बाणोरे या दोघांनी ओळखली आणि २०१०मध्ये ‘देस्ता ग्लोबल’ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यापर्यंत पोहचवून विविध माहिती देण्यास सुरुवात केली. याचबरोबर काळानुरूप योग्य साधनांचा वापर करून शेती अधिक कशी वाढविता येईल, याबाबतही त्यांचे काम सुरू झाले. पण सर्व ठिकाणी व्यक्तिश: पोहोचणे शक्य नव्हते. दरम्यानच्या काळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही खूप वाढले. यामुळे कंपनीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची गरज निर्माण झाली. यामुळे २०१४मध्ये कंपनीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनीश शर्मा यांनी कंपनीत प्रवेश केला आणि ऑनलाइन माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहचण्याची संकल्पना मांडली. यात शेतकऱ्यांना ई-शॉपिंग करण्यासाठी देस्ता मार्ट आणि माहिती देण्यासाठी देस्ता टॉक नावाच्या दोन संकल्पना राबविण्याचे ठरले. सुरुवातीला ही संकल्पना किती यशस्वी होईल याबाबत साशंकता होती. कंपनीत काम करणारेही याबाबत खात्री देत नव्हते. मात्र अवघ्या एक वर्षांच्या अवधीत राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आणि ही संकल्पना यशस्वी करून दाखविली.

असे चालते काम

देस्ता ग्लोबलच्या देस्ता मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीला पूरक साधनसामग्री अगदी बियाणांपासून खतापर्यंत विविध आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षा या ठिकाणी उत्पादनांच्या किमतीवर दहा टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच दहा टक्के वाढ होण्यास मदत होऊ शकते. याचबरोबर देस्ता टॉकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीस पूरक अशी माहिती दिली जाते. यामध्ये हवामानाचा अंदाज, सरकारी धोरणांची माहिती, भाजी बाजारातील दरांमधील बदल, कृषीतंत्रात होणारे बदल, विविध भागांतील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नवीन तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मत, सल्ला आदी तपशील पुरविला जातो. ही सर्व माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून याचबरोबर लघुसंदेश आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहचवली जाते.

असे होते उत्पन्न

सध्या कंपनीचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा संकेतस्थळावरील जाहिराती हा आहे. याचबरोबर प्रायोजक मजकूर आदी माध्यमातूनही कंपनी उत्पन्न मिळवत असते.

भविष्यातील नियोजन

सध्या कंपनी महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात काम करत आहे. हे काम भविष्यात राज्यातील इतर भागांत तसेच राज्याबाहेर नेण्याचा कंपनीचा मानस असल्याचे मोहनीश शर्मा यांनी सांगितले.

नवउद्यमींना सल्ला

सध्या नवउद्यमींसाठी खूप पोषक वातावरण आहे. जेव्हा सरकार आपल्याबरोबर असते तेव्हा आपले काम अधिक सोपे होते. तशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आपण नोकरीत जो ताण घेतो त्यापेक्षा खूप जास्त पटीने ताण यामध्ये असतो. मात्र आपण हे सर्व खूप चांगल्या प्रकारे अनुभवत असतो. ते अनुभवणे हेही एक आव्हानच असते. ते आपण पेलले तर यश आपलेच असल्याचे मोहनीश सांगतात.