मुंबई : अल्पामाऊंड रोडवरील सेवा निवासस्थानातील सदनिका भाडेतत्वावर देण्याचा घाट बेस्ट उपक्रमाने घातला आहे. बेस्टचे हे सेवा निवासस्थान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अंटालिया’ निवासस्थानालगतच आहे. त्यासाठी बेस्ट प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. एका बड्या उद्योजकाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी हा खटाटोप असल्याची चर्चा आहे.
दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या खंबाला हिल परिसरात बेस्ट उपक्रमाने १९९१ मध्ये वीज संग्राही केंद्र आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांसाठी सेवा निवासस्थान उभारले. त्यात ए विंगमध्ये १५, बी विंगमध्ये २०, तर सी विंगमध्ये आठ सदनिका असून त्यापैकी अनुक्रमे एक, पाच आणि तीन सदनिका रिक्त आहेत. तर सी विंगमधील आठपैकी दोन सदनिका बड्या उद्योगपतीला भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. सध्या तिन्ही विंगमध्ये बेस्टचे ३२ अधिकारी वास्तव्यास आहेत. मुंबईच्या विकास आराखडा २०३४ मधील नियमानुसार सदर विद्युत संग्राही केंद्र ही जागा अत्यावश्यक आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे.
त्यासाठी सेवा निवासस्थानातील सी विंगमधील सदनिका भाडेतत्वावर देण्यासाठी प्रथम निविदा मागविण्यात आल्या. या विंगमध्ये वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना आता सदनिका रिकाम्या करण्याची नोटीस देण्यात आली आहे. प्रशासनाने आता ए आणि बी विंगमधील सदनिका भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ए आणि बी विंगमध्ये वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांनाही घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे समजते. घर रिकामे करण्याची नोटीस हाती पडताच सी विंगमधील अधिकाऱ्यांना धक्का बसला. या अधिकाऱ्यांची मुले आसपासच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. दक्षिण मुंबईत बेस्ट उपक्रमाची अनेक सेवा निवासस्थाने आहेत. यातील रिक्त सदनिका या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सेवा निवासस्थानाचे महत्त्व
दक्षिण मुंबईत राजभवन, मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान, सह्याद्री अतिथीगृह, परराष्ट्र दूतावास, बड्या उद्योजकांची निवासस्थाने, तसेच मोठी रुग्णालये आसपासच्या भागात आहेत. यासह विद्युतपुरवठा खंडीत झाल्यास आपत्कालीन अधिकारी तात्काळ उपलब्ध व्हावेत यासाठी हे सेवा निवासस्थान उभारण्यात आले. आता हे सेवा निवासस्थान रिकामे करून सदनिका भाडेतत्वाने देण्याचा घाट घालण्यात आला आहे.