सायबर स्कॅमच्या घटना आता नव्या राहिल्या नाहीत. रोजच अशा बातम्या कानावर येत असतात. मात्र मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा वैयक्तिक सायबर स्कॅम झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेची २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला सायबर चोरट्यांचा पहिला फोन आला, त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात सदर महिलेने भीतीच्या सावटाखाली या चोरट्यांना २५ कोटी रुपये पाठविले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला एका बहुराष्ट्रीय कंपनीतील निवृत्त संचालक आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडित महिलेला व्हॉट्सॲपवर कॉल आला. सदर व्यक्तीने ती टेलिकॉम विभागातील अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेचे तीन मोबाइल क्रमांक लवकरच बंद करणार आहोत, असे सांगितले. पीडित महिलेने याचे कारण विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यांकडे कॉल ट्रान्सफर करत असून तेच याबद्दल माहिती देतील, असे सांगितले.

जैसे ज्याचे कर्म तैसे! कंपनीला गंडा घालून मिळवलेले १ कोटी रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले

यानंतर दुसऱ्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिला मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोप आहे, अशी बतावणी केली. महिलेच्या विरोधात मनी लाँडरिंगची तक्रार दाखल झाली असून महिलेचे मोबाइल क्रमांक आणि आधार कार्ड या खटल्याशी लिंक झाले आहे, असेही समोरून महिलेला सांगण्यात आले. यानंतर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीकडे कॉल ट्रान्सफर केला. तिसऱ्या व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेला धमकावले. जर या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर महिलेला त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवावे लागतील. चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे परत करू, असेही महिलेला सांगण्यात आले.

शेअर्स विकले, दागिने गहाण ठेवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांच्या धमक्यानंतर पीडित महिलेने स्वतःचे आणि आपल्या आईचे शेअर्स विकले. तसेच म्युच्युअल फंडची गुंतवणूक काढून घेतली तसेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले आणि ते पैसे सायबर चोरट्यांना पाठविले. हा सर्व घटनाक्रम दोन महिन्यांपासून सुरू होता.

नागपूर: सायबर फसवणुकीत वाढ, वर्षभरात तब्बल ७७.५७ कोटी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेकडे पैसे जाणार असल्याची थाप मारली

दरम्यान, सायबर चोरट्यानी महिलेच्या नावानेच चालू बँक खाते उघडले होते. या खात्यात पैसे जमा करावेत, असे महिलेला सांगण्यात आले. हे पैसे रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच या पैशांची पावती स्थानिक पोलीस स्थानकातून मिळेल, असेही महिलेला सांगण्यात आले. महिलेने २५ कोटी पाठविल्यानंतर तिला तिचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आतापर्यंत ३१ बँक खाती गोठविली आहेत.