मुंबईः सांताक्रुझ येथील व्यावसायिकाला परदेशातील मोबाइल क्रमांकावरून बंदुकीचे छायाचित्र पाठवून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेचे पोलिसही याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कुर्ला पश्चिम येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे सांताक्रुझ पूर्व येथील कलिना परिसरात दुकान आहे. ते दुकानात असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने २५ लाख रुपयांची मागणी केली. व्हॉट्सअॅपवरून बंदुकीचे छायाचित्र पाठवून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी तक्रारदाराला देण्यात आली.
हेही वाचा : ‘ऑर्बिट व्हेंचर्स’चे राजेन व हिरेन ध्रुव यांना शोधण्याचे आदेश; न्यायालय अवमान प्रकरण
तक्रारदार यांना २१ जुलैला १० वाजता प्रथम दूरध्वनी आला होता. त्यानंतर सात तासांच्या कालावधीत आरोपीने बंदुकीचे छायाचित्रही पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरूवातीला तक्रारदार यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण बंदुकीचे छायाचित्र पाठवल्यानंतर तक्रारदारांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी धमकावणे व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराला धमकावण्यासाठी वापरण्यात आलेला दूरध्वनी प्रथमदर्शनी तरी परदेशातील असल्याचे दिसून येत आहे. आरोपीने वापरलेला दूरध्वनी क्रमांक नॉर्थ कोरोलिना येथील असल्याचे दिसून येत आहे. पण आरोपीने तंत्रज्ञानाच्या मदतीने परदेशी क्रमांक दाखवल्याची शक्यताही आहे. त्याप्रकरणी गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. सध्यातरी या प्रकरणात कोणत्याही संघटीत गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याबाबत ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना धमकावण्याच्या उद्देशाने परिचीत व्यक्तीनेच हा प्रकार केला आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.