मुंबई : भायखळा येथील मदनपुरा डाक कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक कोसळला. संबंधित इमारत अतिधोकादायक म्हणून पूर्वीच घोषित करण्यात आली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

मदनपुरा डाक कार्यालयाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे इमारतीला अतिधोकादायक (सी-१ श्रेणी) म्हणून घोषित करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री इमारतीच्या पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यामागील भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. त्यांनतर संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, म्हाडाचे कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण म्हाडा इमारत रिकामी केली. दरम्यान, रिकामी केलेली संपूर्ण इमारत सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कोसळली.