मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एकाच दिवशी पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील १० शाळांची अचानक तपासणी केली. त्यात महाराष्ट्र, आसाम, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील प्रत्येकी एक ते दोन शाळांची निवड करण्यात आली होती. या तपासणीसाठी १० स्वतंत्र पथके तैनात केली होती, प्रत्येक पथकात सीबीएसई मंडळाचा एक अधिकारी आणि मंडळाशी संलग्न शाळेचे प्राचार्य अशा दोन जणांचा समावेश होता. शाळांच्या प्रत्यक्ष कार्यपद्धती व कारभाराचा अचूक आढावा घेता यावा यासाठी ही मोहीम अचानक एकाचवेळी राबविण्यात आली.

सीबीएसईच्या नियमांनुसार शाळा चालविण्यात येत आहेत का? गैरहजर विद्यार्थ्यांची उपस्थित नोंदवून प्रवेश नोंदीत फेरफार केला जात आहे का?शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का हे पडताळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. या तपासणी मोहीमेत शाळांच्या पायाभूत सुविधा, उपस्थिती नोंदी, प्रशासकीय कामकाज, तसेच अध्यापनाची गुणवत्ता यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्याचप्रमाणे तपासणी दरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित शाळांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा मंडळाने दिला आहे. शिक्षणाच्या दर्जाविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर पावले उचलली जातील. तसेच तपासणी समितीच्या अहवालांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कारवाई करण्यात आलेल्या शाळांची नावे

पाच राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश होता. त्यात आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, बाणेर (पुणे), दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, नेरुळ (नवी मुंबई) आणि क्रिमसन अनीशा ग्लोबल स्कूल, उंद्री (पुणे) याचा समावेश होता. त्याचबरोबरच आसाममधील इंटरनॅशनल स्कूल, गुवाहाटी आणि स्प्रिंग डेल इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांचा; मध्य प्रदेशातील संस्कार पब्लिक स्कूल, नौगाव आणि किडीज कॉर्नर हायर सेकंडरी स्कूल, ग्वाल्हेर; तसेच दिल्लीतील राजेंद्र पब्लिक स्कूल, कर्नाटकातील श्रीराम ग्लोबल स्कूल आणि ओडिशातील ज्युपिटर पब्लिक स्कूल या शाळांचा समावेश होता.