scorecardresearch

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जल्लोष

अनेक विद्यार्थी राष्ट्रध्वज फडकवत, समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र आल्याने उत्साहाला जणू उधाण आले  होते.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जल्लोष
स्वातंत्र्य दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडियावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. (छाया-गणेश शिर्सेकर)

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अवघ्या मुंबापुरीत रविवारी सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे  नागरिक नरिमन पॉइंट येथील समुद्रकिनाऱ्यावर जमण्यास सुरुवात केली. अनेक विद्यार्थी राष्ट्रध्वज फडकवत, समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र आल्याने उत्साहाला जणू उधाण आले  होते. संध्याकाळनंतर हा उत्साह अधिक ओसंडून वाहत होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची घोषणा केल्यानंतर मुंबई महापालिकेने तब्बल ४१ लाख राष्ट्रध्वजांचे मोफत वितरण केले होते. शहरातील अनेक शासकीय इमारती तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. त्याचबरोबर मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यालगतच्या इमारतींसह गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, महापालिका मुख्यालय, रेल्वे मुख्यालय आदी शासकीय कार्यालयाच्या इमारती प्रकाशयोजनेने उजळून निघाल्या आहेत. 

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील वनिता समाज सभागृहात अपंग मुलांनी फुले, पाने आणि कागदाचा वापर करून पर्यावरणस्नेही झेंडा साकारला आहे. सुमारे ७५ फुटांची ही कलाकृती पाहण्यासाठी  नागरिकांनी गर्दी केली होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ किमी दौड

मुंबई : मुंबई पोलीस दलातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ किमी दौड रविवारी पूर्ण करण्यात आली.  तीन आठवडय़ांपासून अमृतमहोत्सवी दौड सुरू होती.

या दौडमध्ये तरुणांसह २० ते २५ वर्षे सेवा केलेले सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार तसेच महिला अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते.

 दौड रविवारी सकाळी साडेसहा वाजता मुरली देवरा चौक, एनसीपीए मरिन ड्राइव्ह येथून सुरू झाली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, अभिनेता अक्षय कुमार आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी   पाच दिवसांपासून  गस्त वाढविली आहे. तर, गर्दीच्या ठिकाणांसह संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

स्थानिक पोलीस, विशेष शाखा आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, श्वान पथक इत्यादी तैनात करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत ध्वजवंदन समारंभ होणार आहे, अशा ठिकाणी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपी, तडीपार आरोपींची, सराईत गुन्हेगार आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली असून नाकाबंदीसह, हॉटेल-लॉज आदींची तपासणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या