मुंबई : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने प्रवासी आरक्षण केंद्र (पीआरएस) मलकापूर येथून दोन दलालांना अटक केली असून त्याच्याकडून १० लाख रुपयांहून अधिक किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त केली. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळालेल्या माहितीनुसार २२ मे रोजी मलकापूर येथील प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) कार्यालयात प्रतिबंधात्मक तपासणी केली. यावेळी दक्षता पथकाने दलालीच्या कामात सहभागी असलेल्या दोन व्यक्तींना अटक केली.

तपासणीदरम्यान पथकाने पीआरएस मलकापूर येथून खरेदी केलेले ३,९६० रुपये किमतीचे वातानुकूलित तत्काळ तिकीट असलेल्या संजय चांडक आणि १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. संजय चांडकचे मुंबईतील दलाल ठाकूरशी संबंध असल्याचे उघड झाले. तो दलालीमधील मूख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते. अधिक चौकशी केल्यानंतर, संजय चांडक याने स्वतःहून मुंबईतील दलालाला व्हॉट्स ॲपवरील संदेशात त्याने पीआरएस मलकापूरद्वारे आरक्षित केलेल्या १८२ जर्नी कम रिझर्वेशन तिकिटांचे फोटो पाठवले होते. यामध्ये एक लाख ६१ हजार ५३५ रुपये किमतीच्या २३ तिकिटांचा आणि आठ लाख ४८ हजार २९८ रुपयांच्या १५९ जुन्या तिकिटांचा समावेश होता. त्यांची एकूण किमत दहा लाख ९ हजार ८३३ रुपये होती. त्यात १८२ तिकिटे होती. ही तिकिटे बेकायदेशीर पुनर्विक्रीसाठी आरक्षित करण्यात आली होती आणि मुंबईतील दलालला पुरवण्यात आली होती, असे चांडकने कबूल केले.

अटक केलेल्या दोन्ही दलालांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मलकापूर येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) निरीक्षकांकडे सोपवण्यात आले. याप्रकरणी रेल्वे कायद्यातील कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. आरपीएफ मलकापूरतर्फे पुढील तपास सुरू आहे.