मुंबई– महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबईकरांना बसू लागला आहे. सर्वच सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस नसल्याने टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारीत खासगी वाहनांच्या सेवा प्रभावित होऊ लागल्या आहेत. घरगुती गॅस देखील बंद होणार असल्याने गृहीणींची तारांबळ उडाली आहे

मुंबई शहराला गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे वडाळा येथील महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. सीएनजी पंपावरील गॅसचा शिल्लक साठा संपत आला आहे. घरगुती गॅस देखील कुठल्याही क्षणी बंद होणार आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनच कोलमडल्याचे दिसून येत आहे.

सीएनजी पंपावर गर्दी

मुंबई बहुतांश रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारीत खासगी टॅक्सी या सीएनजीवर चालतात. रविवारी सीएनजी पुरवठा ठप्प होणार असल्यानचे समजताच रात्रीपासून मुंबईतील विविध सीएनजी पंपावर वाहनचालकांची गर्दी उसळली आहे. रात्री पासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रतीक्षा नगर, वडाळा येथे महागनर गॅसचा सीएनजी पंप आहे. तेथे मोठी गर्दी झाली आहे. एव्हराड नगर पासून एक रांग तर दुसरी रांग भक्ती पार्क पर्यंत गेल्याचे दिसून येत होेते. त्यात रिक्षा, ॲप आधारीत खासगी टॅक्सींचा भरणा होता. या वाहनांच्या रांगेमुळे वाहतूक कोंडीही झाली होती.

गॅस नसल्याने आम्हाला गाडी काढता आला नाही त्यामुळे धंद्यावर परिणाम झाल्याचे रामचरण यादव या रिक्षाचालकाने सांगितले. मी मागील दोन तासांपासून रांगेत आहे, असेही त्याने सांगितले. मला सारखे भाड्यासाठी कॉल्स येत आहेत. मात्र मला ते रद्द करावे लागत आहे. कारण मी बराच वेळ रांगेत आहे. गॅस असल्याशिवाय मी गाडी काढू शकत नाही, असे एझाज अन्सारी या खासगी ॲप आधारीक टॅक्सी चालकाने सांगितले.

सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम

गॅस नसल्याने त्याचा मोठा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडू लागला आहे. बेस्टच्या अनेक बस सीएनजीवर असल्याने त्यांच्यावरही दिवसभरात परिणाम होण्याची शक्यता आहे. रिक्षा चालकांना सध्याचे दर सीएनजी असल्यामुळे परवडतात. पेट्रोलवर गाडी चालवणे शक्य नाही. दुपार नंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

पंपावरील गॅसचा दाब कमी

सीएनजी पुरवठा ठप्प होणार आहे, अशी बातमी रात्री पसरली आणि तेव्हापासून पंपावर गर्दी उसळली आहे, असे पंपाच्या व्यवस्थापकाने सांगितले. गॅसचा दाब (प्रेशर) कमी झाल्याने गॅस भरण्यास नेहमीपेक्षा विलंब लागत असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. गॅस पुरवठा कधी सुरळीत सुरू होईल, त्याची काहीच अधिकृत माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

गृहीणी हवालदील

शनिवारी महानगर गॅसने रहिवाशी संकुलांना पत्रक पाठवून सोमवारी सकाळी ११ ते संध्या ६ पर्यंत गॅस पुरवठा बंद राहील असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे दुपारच्या जेवणाची तजवीज करण्यासाठी गृहीणींची तारांबळ उडाली आहे. सकाळी कामाची लगबग असते त्यात दुपारी गॅस बंद होणार असल्याने दुपारचा स्वयंपाक करावा लागला असे शर्मिला राऊत या महिलेने सांगितले.

पाइपलाइनमध्ये नेमका काया बिघाड झाला आणि तो दुरूस्त होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. या बिघाडामुळे पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला महानगर गॅस लिमिटेडने दिला आहे.