मुंबई : साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी संध्या पाठकने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या मोबाइलमध्ये आढळलेल्या संदेशावरून पोलिसांनी हा निष्कर्ष काढला आहे. संध्याने गुरूवारी सकाळी महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. पोलिसांना तिच्या बॅगेत नैराश्यावरील काही औषधेही सापडली आहेत. अधिक पुरावे मिळविण्यासाठी तिचा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
नालासोपारा येथे राहणारी संध्या पाठक (२१) विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. तिने गुरूवारी सकाळी ७ वाजता महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. संध्याने आत्महत्येपू्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्यामुळे तिची आत्महत्या नसून तिला कुणी तरी ढकलून हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता.
विलेपार्ले पोलिसांनी संध्याचा मोबाइल आणि बॅग ताब्यात घेतली होती. मोबाइलच्या तपासणीत संध्याने एका मुलाला पाठवलेले अनेक संदेश (मेसेजेस) पोलिसांना मिळाले. तसेच संध्याच्या बॅगमध्ये नैराश्यावरील गोळ्या सापडल्या होत्या. या संदेशावरून तिने एकतर्फी प्रेमातून हे पाऊल उचलल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. तिने ज्या मुलाला सदेश पाठवले होते त्याचाही जबाब घेण्यात येणार आहे. तसेच तिला नेमका कुठला आजार होता तेही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नालासोपाऱ्याच्या आचोळे येथे गुरूवारी रात्री संध्या पाठकच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखिका होण्याचे स्वप्न…
संध्याला लिखाणाची आवड होती. लेखिका होण्याचे तिचे स्वप्न होते. वयाच्या विशीतच तिचे पहिले इंग्रजी पुस्तक ‘द वर्ल्ड बेस्ट एक्सफ्रेंड’ प्रकाशित झाले होते. तारूण्यातील प्रेम, विरह आणि मैत्रीचे बंध उलगडवून टाकणारी ही कांदबरी चांगलीच प्रसिध्द झाली होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले. ॲमेझॉनवरील ई कॉमर्स संकेतस्थळावर हे पुस्तक एप्रिल महिन्यात प्रसिध्द झाले होते.