मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ५ हजार १८५ नवे करोनाबाधित सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या करोनाबाधितांचा आकडा कसा नियंत्रणात आणता येईल, याविषयी पालिका प्रशासन विचार करत आहे. त्यामध्ये मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र, असं असलं तरी वाढते करोनाबाधित ही मुंबईकरांची चिंता वाढवणारी बाब ठरली आहे.

पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात ५ हजार १८५ नवे करोनाबाधित सापडले असून मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ७४ हजार ६११ इतकी झाली आहे. त्यापैकी ३० हजार ७६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत. करोनाचं संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने ३ हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ ५ हजारांच्या वर गेली आहे.

 

दिवसभरात मुंबईत ६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ११ हजार ६०६ वर पोहोचला आहे. त्यासोबतच मुंबईचा रिकव्हरी रेट देखील गेल्या महिन्याभरापासून ९० टक्क्यांच्या आसपासच रेंगाळत असून त्यामध्ये फारशी वाढ होताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर मुंबईत काही प्रमाणात निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सरसकट लॉकडाऊन आणि मुंबई लोकल बंद करण्याचा कोणताही विचार सध्या पालिकेसमोर नाही, असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.