मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यापासून सुरू महापालिका प्रशासनाच्या मागे लागलेला ससेमिरा संपलेला नाही. बांधकामातील त्रुटींमुळे टीकेला सामोरे जावे लागणाऱ्या पालिका प्रशासनाला आता पुलावर फिरणाऱ्या गायींनी हतबल केले आहे. गोखले पुलाची आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले असले तरी गोखले पुलावरील गायींचा मुक्त संचार रोखण्यात पालिका यंत्रणा अपयशी ठरली आहे.

गोखले पुलावरील पदपथाची रुंदी कमी केलेली असल्यामुळे या गाई समोरून येत असताना पादचाऱ्यांची घाबरगुंडी उडते. वाहतूकही खोळंबून राहते. गोखले पुलाची एक बाजू सुरू झाली आणि काही महिन्यांतच या पुलावरून गाईंची ने आण करणाऱ्यांचा वावरही सुरू झाला आहे.

हेही वाचा – स्मार्ट मीटरबाबत अपप्रचार थांबवा; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना सल्ला

रहिवासी संघटनेचे पत्र

याबाबत अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेने पालिकेला पत्रही लिहिले आहे. पादचाऱ्याला चालायला जागाच उरत नाही. अनेक जण घाबरून मागे जातात, तर काही जण पुलाच्या भिंतीवरून उडी मारतात. गाय घेऊन जाणाऱ्या महिला मात्र आपला रस्ता बदलत नाहीत, अशी प्रतिक्रिया संघटनेचे धवल शाह यांनी दिली. कधीकधी अचानक गायी रस्ता ओलांडत असल्यामुळे वाहतूक कोंडीही होते, अशी माहिती आणखी एका सदस्यांनी दिली.

गायी येतात कुठून?

अंधेरी जोगेश्वरी पूर्वेकडील गोठ्यातून भाड्याने गाय आणायची आणि ती सकाळी मंदिरांच्या दारात नेऊन बांधायची, दिवसभर गायीला खाऊ घालणाऱ्यांकडून पैसे कमवायचे असा धंदा या परिसरात चालतो. त्यासाठी गोठ्यातून विविध मंदिरांमध्ये गायी नेल्या जातात.

हेही वाचा – मुंबईतील १९२ शाळांना आरटीईची मान्यता; उर्वरित शाळांना पुर्नमान्यता देण्याची कार्यवाही सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेला डोकेदुखी

रस्त्यावर मोकाट फिरणारी गाय पकडून पालिकेच्या कोंडवाड्यात टाकण्याची कारवाई पालिका करते. मात्र कोंडवाड्यात जनावरे ठेवण्यास मर्यादा आहेत. तसेच गोठ्यांचे मालक येऊन दंड भरून जनावरे सोडवून नेतात व पुन्हा रस्त्यावर जनावरे दिसतात. जी जनावरे सोडवून नेण्यास कोणीही पुढे येत नाही अशी जनावरे प्राणीप्रेमी संस्थांना दिली जातात, अशी माहिती पालिकेच्या पशुवध गृह विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.