मुंबई : फिरायला घेऊन गेलेल्या श्वानाला त्रास दिल्याबद्दल जाब विचारणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर हल्ला करण्यात आल्याची घटना वांद्रे पश्चिम परिसरात घडली. या हल्ल्यात वृध्दाचे दोन दात पडले असून दुखापत झाली आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ला करणाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वान प्राणीप्रेंमीचा आवडता प्राणी. अनेक जण श्वान पाळतात. एकीकडे भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असताना असे पाळीव श्वान मात्र लाडात असतात. परंतु अनेकांना श्वानप्रेमींचा त्रास होत आहे. पाळीव श्वान रस्त्यात घाण करतात, अंगावर भुंकतात असा समज त्यांचा असतो. त्यातून वादविवाद होतात. तक्रादार नील डिमेंटो (६०) वांद्रे पश्चिम येथील २४ व्या रस्त्यावर राहतात. ते ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास आपल्या श्वानाला घेऊन फिरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका तरूणाने त्यांना हटकले आणि तो श्वानाची छेडछाड करू लागला. माझ्या श्वानाला का त्रास देतो अशी विचारणा करीत पिमेंटो यांनी त्याला विरोध केला.

लोखंडी सळईने मारहाण

श्वानाला त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या हातात लोखंडी सळई होती. त्याने त्या लोखंडी सळईने डिमेंटो यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात डिमेंटो यांचे दोन दात तुटले. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती पिमेंटो यांच्या मदतीला आली. त्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी डिमेंटो यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपी फईम काझी (२०) भंगार विक्रेता आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.