मुंबई : चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळ्या युक्त्या करीत असतात. अशाच एका अनोख्या चोरीचा प्रकार मुंबईत उघडकीस आला. चोरांच्या टोळीने सर्व योजना व्यवस्थित बनवली होती. मात्र त्यांनी केलेल्या एका चुकीने ते गजाआड गेले.

मुंबई शहरात महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) केबल्सचे जाळे पसरले आहे. या केबल भूमिगत असतात. त्यातून दूरध्वनी यंत्रणा जोडलेली असते. या केबल्स खूप महाग असतात. त्यामुळे या केबल चोरण्याची योजना चोरांच्या एका टोळीने आखली. भूमिगत केबल चोरणे सोप्पे नसते. तसे केल्यास पकडले जाण्याची शक्यता असते.

चोर बनले एमटीएनएलचे कर्मचारी

या चोरांनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे कर्मचारी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी ८ जणांनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांसारखा गणवेश मिळवला. केबल काढण्यासाठी लागणारे साहित्य, एक क्रेन, दोन ट्रक असा लवाजमा आणला. त्यामुळे कुणालाही संशय आला नसता. ही टोळी बुधवारी पहाटे साडेतीन वाजता जोगेश्वरी पश्चिम येथील फारूक शाळेसमोर पोहोचली. त्यांनी आपले काम सुरू केले. नाल्याजवळील जागा खणून केबल काढण्यात आल्या. क्रेनच्या सहाय्याने त्या ट्रकमध्ये भरण्यात येत होत्या. सारी योजना बरोबर सुरू होती.

…आणि पोलिसांना संशय आला

नेमके त्याच वेळी जोगेश्वरी पोलिसांचे पथक गस्तीवर होते. त्यांनी हा प्रकार पाहिला. सहज चौकशी केली तेव्हा आपण महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे कर्मचारी असून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना त्यात काही वावगे वाटले नाही. मात्र एवढ्या मध्यरात्री सुरू असलेल्या कामबद्दल पोलिसांना संशय आला. आरोपींनी त्यावर समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी मग थेट एमटीएनएलशी संपर्क साधला. तेव्हा या चोरांचे बिंग फुटले. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे कुठलेही कर्मचारी असे काम करत नसल्याचे समजले. तेव्हा हा केबल चोरीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

८ जणांना अटक, ५८ लाखांची केबल चोरी

या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. त्यांनी एकूण १ हजार ११० मीटर लांबीची एमटीएनएलची केबल चोरली असून त्याची किंमत सुमारे ५८ लाख रुपये आहे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या केबल चोरीमुळे एमटीएनएनएलची सेवा बाधीत झाली होती.