नोकरदारांना नित्यनियमाने दुपारच्या भोजनाचा डबा कार्यालयात वेळेवर पोहोचवणाऱ्या डब्बेवाल्यांना थोडा आराम मिळावा यासाठी शिवसेनेनं पाच ई- सायकलचं वाटप केलं आहे. डब्बेवाल्यांमध्ये काही ज्येष्ठ डब्बेवाले गुडघेदुखीनं त्रस्त आहेत. उतार वय आणि सायकल चालवून अनेक ज्येष्ठ डब्बेवाल्यांना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आहे, म्हणूनच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डब्बेवाल्यांना ई- सायकलचं वाटप केलं आहे.
या ई- सायकलची किंमत ३७ हजार आहेत. त्यातल्या प्रत्येक सायकलसाठी २५ हजार रुपये शिवसेना मोजणार आहे तर उर्वरित खर्च डब्बेवाले आपल्या खिशातून करणार आहेत. पूर्णपणे चार्ज झालेली सायकल १०० किलोमीटर न थांबत चालू शकते. सायकल रस्त्यावरून चालवताना डब्बेवाल्यांना मोठे कष्ट पडतात. काहींना गुडघेदुखीच त्रासही होतो. पण ई- सायकलमुळे मात्र हा त्रास कमी होणार आहे अशी माहिती मुंबई डब्बेवाला संघटनेचं प्रवक्ते सुहास तळेकर यांनी दिली.
काल recycling आणि e-cycling असा दिवस होता, दिवसभर प्लास्टिक recycling वरच्या उपाययोजनांवर चर्चा केली आणि मुंबईत १३० वर्ष, ३ पिढ्या मुंबईची सेवा करणारे डब्बेवाले दिवसभर मेहनत घेऊन आपलं काम करत असतात त्यांच्या श्रमात थोडा आराम मिळावा म्हणून संध्याकाळी त्यांना electric सायकल दिल्या. pic.twitter.com/NWjBGYApmb
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 17, 2018
पाच ई-सायकलनंतर काही दिवसांनी आणखी २० ई- सायकल संघटनेला देण्यात येणार आहे. उपनगरात या सायकल वापरता येतील. संघटनेतल्या ज्येष्ठ डब्बेवाल्यांना याचा फायदा होणार आहे. ‘मुंबईत १३० वर्ष, ३ पिढ्या मुंबईची सेवा करणारे डब्बेवाले दिवसभर मेहनत घेऊन आपलं काम करत असतात. त्यांच्या श्रमात थोडा आराम मिळावा म्हणून सायकल वाटप केलं’ अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली.