मुंबई : दहिसरमध्ये थर रचण्याचा सराव करताना मृत्युमुखी पडलेल्या महेश जाधव (११) या मुलाच्या कुटुंबियांना आमदार प्रकाश सुर्वे यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र त्याच्या आईकडे आधार कार्ड किंवा बॅंक खाते नसल्याने ही मदत देता आली नाही. दरम्यान, या दुर्घटनेनंतर नवतरूण मित्र मंडळाने यंदाचा आपला उत्सव रद्द केला आहे.
दहिसरच्या केतकीपाडा येथील नवतरूण मित्र मंडळाचे गोविंदा गेल्या काही दिवसांपासून दहिहंडी उत्सवाची तयारी करीत होते. रविवारी सराव सुरू असताना महेश जाधव सहाव्या थरावरून खाली कोसळला. त्याला झेलण्यासाठी कुणी नसल्याने तो जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मदत आईलाच देण्याचा निर्णय
महेश जाधव हा मागील ४-५ वर्षांपासून नवतरूण मित्र मंडळाच्या दहिहंडी पथकात सहभागी होत होता. मागील वर्षी त्याने या पथकातर्फे दहिहंडी फोडली होती. त्याला तीन लहान भाऊ आहेत. त्याची आई घरकाम करते, तर वडील मजुरी करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते धारखडी येथे भाड्याच्या घरात राहतात. या दुर्घटनेनंतर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी महेशच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. महेशचे वडील मद्यपान करत असल्याने ही मदत त्यांना न देता आईच्या नावावर देण्याचे ठरवले होते.
ना आधार कार्ड, ना बँकेत खाते..
महेशच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यासाठी सुर्वे यांनी त्याच्या आईची भेट घेतली. मात्र महेशची आई संगिता जाधवचे बॅंकेत खातेच नव्हते. तिच्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मोबाइलही नव्हता. त्यामुळे धनादेश देता आला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी महेशच्या आईच्या नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड बनविण्यात येणार आहे. बॅंकेत खाते उघडताना ओटीपी येतो. यासाठी मोबाइल आवश्यक असतो. त्यासाठी तिला एक मोबाइल देण्यात आला. महेशच्या आईचे आधारकार्ड आणि पॅन कार्ड तयार झाल्यानंतर बॅंकेत खाते उघडण्यात येईल आणि त्यानंतर हा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना (शिंदे) शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांनी दिली.
नवतरूण मंडळाची दहीहंडी रद्द
या दुर्घटनेनंतर नवतरूण मित्रमंडळाने यंदा आपला दहिहंडी उत्सव स्थगित केला आहे. मंडळाच्या अध्यक्षाविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दहिहंडी उत्सात १४ वर्षांखालील मुलांचा वापर न करण्याचा नियम आहे. तरी देखील हा नियम डावलून लहान मुलांना सहभागी करून घेतले जात होते. या दुर्घटनेनंतर दहिसरमधील मंडळाने लहान मुलांना पथकातून काढून टाकले आहे.