मुंबई : मागील काही महिन्यांपासून अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमडीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र आता १२ ऑगस्टनंतर घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे आणि सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) केले आहे.
१२ ऑगस्टनंतर घरोघरी जाऊन होणारे सर्वेक्षण बंद होणार असले तरी डीआरपी आणि एनएमडीपीएलच्या कार्यालयात जाऊन रहिवाशांना सर्वेक्षणासाठी कागदपत्रे जमा करून पात्रता निश्चिती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
धारावीतील रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यासाठी डीआरपीने बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी बायोमेट्रिक सर्वेक्षणास सुरुवात झाली. या सर्वेक्षणाअंतर्गत आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर एक लाखांहून अधिक झोपड्यांना युनिक नंबर देण्यात आले आहेत. एनएमडीपीएलची पथके मागील कित्येक महिन्यांपासून घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करून घेऊन सर्वेक्षण करीत आहेत.
हे सर्वेक्षण शक्य तितक्या लवकरच डीआरपी आणि एनएमडीपीएलला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आता १२ ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन एनएमडीपीएलची पथके कागदपत्रे जमा करून बायोमेट्रिक सर्वेक्षण करून घेणार असल्याचे डीआरपीकडून जाहीर करण्यात आले आहे. ज्या झोपडीधारकांचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही त्यांनी एनएमडीपीएलच्या पथकाला सहकार्य करावे आणि सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन डीआरपीकडून करण्यात आले आहे.
डीआरपीच्या निर्णयानुसार १२ ऑगस्टनंतर घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार नाही. मात्र त्याचवेळी डीआरपी किंवा एनएमडीपीएलच्या कार्यालयात जाऊन रहिवाशांना कागदपत्रे जमा करून बायोमेट्रिक सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या आधारे रहिवाशांचे परिशिष्ट -२ जाहीर केले जाणार आहे. या परिशिष्ट -२ यादीत जे रहिवासी पात्र ठरतील तेच धारावी पुनर्विकास योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक सर्वेक्षण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान पात्र रहिवाशांना धारावीत मोफत घरांच्या योजनेत समावून घेतले जाणार आहे. तर अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घरे दिली जाणार आहेत.