मुंबई : प्लास्टिक सर्जरी आजही मोठ्या शहरांतच सीमित आहे. आदिवासी आणि दुर्गम भागात मूलभूत आरोग्य सुविधाच तोकड्या असताना प्लास्टिक सर्जरीसारखे आधुनिक उपचार फारच लांबची गोष्ट. पण मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीरंग पुरोहित आणि त्यांच्या टीममुळे गडचिरोलीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोलीत त्यांनी २७ आणि २८ जून या दोन दिवसांत एकूण २९ प्लास्टिक सर्जरी केल्या, यात १७ लहान मुलांचा समावेश आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेच्या वतीने चालवल्या जात असलेल्या माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले जातात. यातच डॉ. पुरोहित २०१९पासून प्लास्टिक सर्जरीची शिबीर घेतात. जून महिन्यात झालेल्या शिबिरात लिपोसक्शन, हायस्पेडियास, बायलॅटरल गायनॅको मास्टिया अशा विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
“गेल्या साडेपाच वर्षांत आम्ही १० शिबिरातून ३००पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. महानगरांसारख्या दर्जेदार सुविधा ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या टीममध्ये भूलतज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जनची टीम असते. शिवाय ‘सर्च’मधील डॉक्टरांची टीम आमच्या मदतीला असतेच. ‘सर्च’ ज्या सेवाभावी ध्येयाने कार्यरत आहे, त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते,” असे डॉ. पुरोहित यांनी सांगितले.
‘सर्च’ रुग्णालयात गरजू आदिवासी आणि ग्रामीण रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा आहे. तसेच १५ वर्षांखालील सर्वच लहान मुलांवर विनामूल्य उपचार हेही ‘सर्च’चे वैशिष्ट्य आहे. डॉ. पुरोहित यांच्या या शिबिरात राजनपल्ली गावातील (तालुका सिरोंचा) शानू श्रीनिवास जंगम या ४ वर्षांच्या मुलावर हायपोस्पॅडियासची शस्त्रक्रियेचे दोन टप्पे पूर्ण करण्यात आले. तिसरी शस्त्रक्रिया सहा महिन्यांनंतर केली जाणार आहे. या व्याधीत मूत्रमार्ग चुकीच्या जागी असल्याने लघवीच्या वेळी फार वेदना होतात. शानूची आई संगीता शेतमजूर आहे, तर वडील श्रीनिवास ट्रॅक्टर चालक आहेत. “शानूवर शस्त्रक्रिया करावी लागणार होती, पण खर्चामुळे आम्ही घाबरत होतो. ‘सर्च’मुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला,” अशी प्रतिक्रिया श्रीनिवास यांनी दिली आहे. ‘सर्च’ रुग्णालयाचे प्रशासक डॉ. अश्विन राघमावर म्हणाले, ‘या वर्षी प्लास्टिक सर्जरीची ३ शिबीर घेण्याचे नियोजन आहे, यातून १०० रुग्णांवर उपचार केले जातील.’
गेली सहा वर्षे डॉ पुरोहित हे या प्लास्टिक सर्जरी शिबीरांचे आयोजन करत असून यांच्यासोबत या शिबिरात मुंबईतील ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. नितिन मोकल, डॉ. सुशील नेहेटे, डॉ. निकुंज मोदी, डॉ. प्रतिक शहा, डॉ. नंदिनी दवे, डॉ. दीक्षिता शेट्टी आणि डॉ. लीला जैन यांनीही शस्त्रक्रियेत मोलाचा वाटा उचलला आहे.डॉ. शेखर भोजराज हे ‘सर्च’चे विश्वस्त आहेत. डॉ. भोजरात २००४पासूनच ‘सर्च’सोबत कार्यरत आहेत. डॉ. भोजराज यांच्या माध्यमातून डॉ. पुरोहित ‘सर्च’शी संपर्क आला. “ पुरोहित यांच्यासोबतच सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल २०१९पासून ‘सर्च’ची जोडले आहेत. त्यांचाही या उपक्रमात मोलाचा वाटा आहे,’ असे माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. अश्विन राघमवार यांनी सांगितले. माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलचे सर्जरी फेलो डॉ. अमित पाटीदार यांनी गेल्या महिन्यात झालेल्या सर्जरी कँपच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
“पुरुषांमध्ये काही वेळा स्तनांची वाढ झालेली असते. यासाठी बायलॅटरल गायनॅकोमास्टिया ही शस्त्रक्रिया करावी लागते. ही शस्त्रक्रियाही यंदाच्या शिबिरात यशस्वीरीत्या करण्यात आलेली आहे. तसेच लहान मुलांत मूत्रमार्ग चुकीच्या जागी असण्याचे प्रकारही असतात. याला हायपोस्पेडियास असे म्हटले जाते. यावरील शस्त्रक्रिया प्रत्येक शिबिरात होतात. हायपोस्पेडियास वरील शस्त्रक्रियांची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करता येणे हा फार मोठा दिलासा आहे,” असे डॉ. पाटीदार म्हणाले.