Mumbai मुंबईला मायानगरी असं म्हटलं जातं आणि स्वप्न नगरीही. या मुंबईत लोक आपलं स्वप्न घेऊनच येतात. अनेकांची स्वप्नं पूर्ण होतात अनेकांची अपूर्ण राहतात. काहींना इथे येऊन आपण एका चक्रात अडकलोय असंही वाटतं. एका रेडइट युजरने अशीच त्याची व्यथा मांडली आहे. मुंबईत घर घेणं किती दुरापास्त होत चाललं आहे असं या युजरने म्हटलं आहे.

काय आहे रेडइट युजरची पोस्ट?

माझा पगार महिना अडीच लाख रुपये आहे. भारतात ज्या प्रकारचे पगार किंवा वेतन दिलं जातं त्या तुलनेत हा चांगला पगार आहे यात माझ्या मनात तरी काही शंका नाही. तरीही मुंबईत माझ्या छोट्याश्या कुटुंबासह राहणं कठीण होतं आहे. कारण मुंबईत मला मनासारखं घर घेता येत नाही. मला आलिशान घर नको आहे. मला एक छोटसं नीट नेटकं घर हवं आहे. मात्र मुंबईत अशा पद्धतीचं घर घेणंही कठीण आहे. सध्याच्या घडीला मुंबईत घर घ्यायचं असेल तर पाच कोटी रुपये हवेत. मी तीन कोटी रुपयांपर्यत घर घेण्याची तयारी दर्शवली होती. त्याचा इएमआय हा साधारण दीड लाख रुपये महिना आहे. पण नंतर विचार केला की पगारातला निम्म्याहून अधिक भाग हा ईएमआय चुकवण्यात जाईल. आजारपण, ऐनवेळी येणारे खर्च, जमा पुंजी या सगळ्या गोष्टी बाजूला पडतील आणि मला फक्त बँकेचे हप्ते भरत बसावं लागेल, असं या युजरने म्हटलं आहे.

माझ्याप्रमाणे ही जवळपास प्रत्येकाचीच व्यथा आहे, असंही रेडइट युजरने म्हटलंय

हा रेड इट युजर पुढे म्हणतो, मी जी पोस्ट केली आहे ती फक्त माझी कहाणी नाही. माझ्याप्रमाणे अनेक लोक काम करतात. त्यांनाही घर घ्यायचं म्हणजे खूप विचारच करावा लागतो. पैसे लाखांमध्ये कमवतात तरीही स्वतःचं घर मुंबईत घ्यायचं म्हणजे किमान पाच कोटी रुपये खर्चाची तयारी ठेवावी लागते. तसं करायचं नसेल तर मुख्य शहरापासून लांब जाऊन रहावं लागेल याची तयारी ठेवावी लागते. मेहनत करायची लाखांमध्ये पगार घ्यायचा आणि स्वतःचं घरही घेता येत नाही. मग या सगळ्याचा काय उपयोग? असं म्हण त्या युजरने त्याची भूमिका मांडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत अनेकांकडे स्वतःचं घर नाही ही वस्तुस्थिती

मुंबईत मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असे वर्ग आहेत. या वर्गांमध्ये राहणारे लोक या समस्यांना सामोरे जातातच. अनेकांकडे स्वतःचं घर नाही त्यामुळे ते भाडे तत्वावर घर घेऊन राहतात किंवा मग पश्चिम उपगनरांच्या पलिकडे विरार वगैरेला राहून मुंबईला ये-जा करणं पसंत करतात. मुंबईत घरांचे दर इतके वाढले आहेत की घर घेणं दोन ते तीन लाख पगार प्रति महिना घेणाऱ्यांनाही शक्य नाही. या युजरने हीच व्यथा त्याच्या पोस्टमधून मांडली आहे.