मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसीसाठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध केला आहे. ‘बीकेसी कनेक्टर’खालून जाणारा १८० मीटर लांबीचा रस्ता (मिसिंग लिंक) पूर्ण करण्यात आला. हा रस्ता सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला जाईल. यामुळे प्रवासातील १५ मिनिटांची बचत होईल.

वांद्रे-कुर्ला वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून त्यावर उपाय म्हणून सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता उभारण्यात आला. त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. तर पूर्वमुक्त मार्गावरून थेट ‘बीकेसी’ते येण्यासाठी जोडमार्ग बांधण्यात आला आहे. त्यामुळे २०१९ पासून पूर्व द्रुतगती मार्ग ते बीकेसी प्रवास वेगवान झाला आहे. दरम्यान, बीकेसी जोड मार्गावरील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गर्दीच्या वेळी बीकेसीतील अंतर्गत रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते. या परिसरात विविध ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते.

हेही वाचा : वास्तुरचनाकार – नियोजनकार शिरीष पटेल यांचे निधन

बीकेसीतील ‘जी ब्लाॅक’मधील भूखंड क्रमांक सी ८० आणि भूखंड क्रमांक सी ७९ ला जोडणारा, ‘बीकेसी कनेक्टर’च्या खालून जाणारा असा हा नवा रस्ता आहे. सेबी इमारत एवेन्यू ५ (बीकेसी कनेक्टर रोड) आणि एवेन्यू ३ दरम्यानचा हा १८० मीटर लांबीचा रस्ता आहे. ३.९८ कोटी खर्चाच्या आणि सहा मार्गिकांच्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण केल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : सिफिलीस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंडीमुक्ती

कामे पूर्ण झाल्याने सोमवारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असून प्रवासातील १५ मिनिटांचा कालावधी वाचेल. शिवाय एमसीए क्लब, वाणिज्य दूतावास, एमटीएनएल जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल.